अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठीचा खर्च वसूल करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

ठाणे : मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवास सुरक्षित आणि जलद व्हावा तसेच लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ व्हावी, यासाठी आखण्यात आलेल्या ‘कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टीम’ (सीबीटीसी) या अत्याधुनिक सिग्नल यंत्रणेच्या उभारणीसाठी हालचालींनी वेग घेतला आहे. केंद्र आणि राज्य सरकार या यंत्रणेच्या निर्मितीसाठी विभागून खर्च करणार होते. मात्र, राज्य सरकारने ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर ढकलली असून ज्या भागांत ‘सीबीटीसी’ उभारायची आहे, त्या भागातील महापालिका तसेच अन्य प्राधिकरणांकडून खर्च घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

चर्चगेट-विरार, सीएसएमटी-पनवेल आणि सीएसएमटी-कल्याण अशा तिन्ही उपनगरीय रेल्वेमार्गावर ‘सीबीटीसी’ सिग्नल यंत्रणा बसवण्याचे यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे. या यंत्रणेच्या उभारणीसाठी एकूण किती खर्च अपेक्षित आहे, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, रेल्वे अर्थसंकल्पातील घोषणेनुसार यासाठीचा ५० टक्के केंद्र सरकार करणार असून ५० टक्के खर्च राज्य सरकारला करावा लागणार आहे. मात्र, राज्य सरकारने आता हे ओझे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाठीवर टाकले आहे.

पहिल्या टप्प्यात सीएसटी ते पनवेल या मार्गावरील सिग्नल यंत्रणेचे आधुनिकीकरण हाती घेतले जाणार असून यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण, सिडको, मुंबई महापालिकेकडून प्रत्येकी १५ टक्के आणि नवी मुंबई महापालिकेकडून पाच टक्के इतका खर्च वसूल केला जाणार आहे. खर्चाच्या वाटय़ाचे हे कोष्टक राज्य सरकारने संबंधित प्राधिकरणांना पाठविले असून चर्चगेट ते विरार आणि ठाणे-कल्याण मार्गावर तेथील महापालिकांकडून खर्चाची उभारणी करण्याचा विचार केला जात आहे. सीएसटी -कल्याण मार्गादरम्यान मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर या महापालिकांचा समावेश होतो. उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता या स्थानिक स्वराज्य संस्थांवर खर्चाचा फार भार टाकता येणार नाही.  यामुळे या भागातील खर्चाची उभारणी नेमकी कशी असावी यावर विचार केला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाकडून अंतिम मान्यता मिळताच सीएसटीएम ते पनवेल या मार्गावर पहिल्या टप्प्यात ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम हाती घेतले जाईल, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस.खुराणा यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

सीबीटीसीयंत्रणा काय?

  • मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात येणाऱ्या सीबीटीसी सिग्नल यंत्रणेमुळे सध्या चार मिनिटाच्या अंतराने धावणाऱ्या लोकल गाडय़ा दोन मिनिटाच्या अंतराने धावू शकतील. दोन गाडय़ांमधील वेळ कमी झाल्याने लोकल गाडय़ांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करणे शक्य होणार आहे.
  • सध्या एका तासात अप-डाऊन या दोन्ही मार्गावर १८ लोकल गाडय़ांच्या फेऱ्या होतात. नवीन सिग्नल यंत्रणेमुळे एका तासात लोकल गाडय़ांच्या फेऱ्यांमध्ये सहा गाडय़ांनी वाढ होणार आहे.
  • या सिग्नल यंत्रणेमुळे गाडीच्या मोटरमनला पुढील आणि मागील लोकल गाडय़ांचे निश्चित ठिकाण कळणे सहज शक्य होणार आहे.