News Flash

सरकत्या जिन्यांची देखभाल कागदावरच

रेल्वे स्थानकातील प्रवाशांची पायपीट कमी करण्यासाठी बसवण्यात आलेले सरकते जिने प्रवाशांसाठी तापदायक ठरू लागले आहेत.

ठाणे येथील सरकता जिना गेल्या आठवडय़ात नादुरुस्त झाला, तर ठाकुर्ली येथील जिना अनेकदा बंदच असतो.

ठाण्यातील दुर्घटनेनंतर प्रवाशांमध्ये घबराट; अन्य स्थानकांतील सरकते जिने बेभरवशी

रेल्वे स्थानकातील प्रवाशांची पायपीट कमी करण्यासाठी बसवण्यात आलेले सरकते जिने प्रवाशांसाठी तापदायक ठरू लागले आहेत. गेल्या आठवडय़ात ठाणे स्थानकातील सरकत्या जिन्यावर झालेल्या अपघातानंतर या जिन्यांवरून चढ-उतार करण्यास प्रवासी अनुत्सुक असल्याचे दिसून येत आहे. मध्य रेल्वेने २०१३पासून विविध स्थानकांमध्ये सरकते जिने बसवण्यास सुरुवात केली असली तरी, या जिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्याचेही स्पष्ट होत आहे.

मध्य रेल्वेतील गर्दीच्या स्थानकांमधील ठाणे, कल्याण, डोंबिवली या स्थानकांमधील सरकते जिने वारंवार बंद पडत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून वारंवार केल्या जात आहेत. ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवरील नव्याने बसवण्यात आलेल्या सरकत्या जिन्यात काही काळातच तांत्रिक बिघाड झाल्याने ते वारंवार बंद होऊ लागल्याचे चित्र स्थानक परिसरात पाहायला मिळत होते. टिटवाळा, डोंबिवली या स्थानकांतील सरकत्या जिन्यांबाबतही अशाच तक्रारी आहेत. त्यातच ठाणे स्थानकातील सरकत्या जिन्यात झालेल्या बिघाडानंतर या जिन्यांचा वापर करणे प्रवासी टाळू लागले आहेत. या जिन्यांची देखभाल व दुरुस्ती नियमितपणे होत नसल्याने बिघाडाच्या घटना घडत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. ठाणे स्थानकात फलाट क्रमांक एकवरील सरकत्या जिन्यावर अपघात घडला तेथे दुरुस्तीचे काम अजूनही सुरू आहे. त्यामुळे येथून प्रवाशांना येजा करण्यास मनाई करण्यात आल्याने उपलब्ध पादचारी पायऱ्यांवर प्रवाशांचा भार आणखी वाढल्याचे चित्र आहे.

दरम्यान, सरकते जिने बसवण्यासाठी वेगाने हालचाली करणाऱ्या रेल्वे प्रशासनाने ते कार्यान्वित आहेत की नाही, हे तपासण्याचीही तसदी घेतलेली नाही. ठाकुर्ली स्थानकात बसवण्यात आलेल्या सरकत्या जिन्यांना अनेकदा चक्क कुलूप लावल्याचे दिसून येते.

कल्याणमध्ये कोपऱ्यात जिना

कल्याण रेल्वे स्थानकात सात फलाट आणि चार पादचारी पूल असून कल्याणच्या पश्चिम दिशेला फलाट क्रमांक एकच्या परिसरात सरकता जिना बांधण्यात आलेला आहे. स्थानक परिसरातील एका कोपऱ्यात उभारण्यात आलेल्या या सरकत्या जिन्याकडे प्रवासी अपवादानेच फिरकतात असे चित्र आहे.

रेल्वे प्रशासनाकडून बसविण्यात येणाऱ्या सरकत्या जिन्यांमध्ये वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे प्रवाशांना पायपीट करावी लागत आहे. प्रशासनाकडून योग्य देखभाल घेतली जात नसल्याने हे सरकते जिने वारंवार बंद होण्याच्या घटना घडत आहेत. प्रशासनाच्या कामातील हलगर्जीपणामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

नंदकिशोर देशमुख, रेल्वे प्रवासी संघटना

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 2:24 am

Web Title: railway station escalator care issue
Next Stories
1 मासुंदा तलावाची सफर महाग!
2 फौजफाटा असूनही पालिका निष्क्रिय
3 ३५५ गुन्हे दाखल, ६० लाखांचा माल जप्त
Just Now!
X