|| आशीष धनगर

डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची भाजप उमेदवारावर प्रश्नांची सरबत्ती:– विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी बुधवारी सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकात अवतरलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांना प्रवाशी मतदारांकडून विविध प्रश्नांवर खडे बोल ऐकण्याची वेळ आली. महायुतीचे उमेदवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत मोठय़ा लवाजम्यासह स्थानकात आलेले भाजप कार्यकर्ते ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ च्या घोषणा देत उमेदवाराचे परिचय पत्रक प्रवाशांना वाटत होते. हे प्रचार पत्रक स्वीकारताना शहरातील वाहन कोंडी, पडलेले खड्डे, स्थानक परिसरातील फेरीवाले या प्रश्नांवरून प्रवाशांकडून कार्यकर्त्यांवर प्रश्नांची अक्षरश: सरबत्ती सुरू होती.

डोंबिवली शहरात खड्डे, वाहतूक कोंडी आणि विजेच्या लपंडावामुळे नागरिक अक्षरश: त्रस्त आहेत. भाजपचे बडे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच मध्यंतरी डोंबिवलीचा उल्लेख घाणेरडे शहर असा केल्यामुळे स्थानिक नेत्यांना घरचा आहेर मिळाला होता.  गेल्या काही दिवसांपासून कल्याण, डोंबिवली ही शहरे चहुबाजूंनी कोंडीत सापडली आहे. कोपर पूल, पत्री पुलाची कामे रखडल्याने या कोंडीत दिवसागणिक भर पडत असून नागरिकांचे अतोनात हाल सुरू आहेत. डोंबिवली औद्योगिक पट्टय़ातील प्रदूषणाचा प्रश्नही ऐरणीवर असून या पाश्र्वभूमीवर यंदा होणारा निवडणूक प्रचार रंगतदार अवस्थेत येऊन पोहोचला आहे. असे असताना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गल्लोगल्ली फिरणाऱ्या नेत्यांवर नागरिकांकडून प्रश्नांची सरबत्ती होताना दिसत आहे. बुधवारी सकाळी प्रचारासाठी डोंबिवली स्थानकात अवतरलेल्या भाजप उमेदवारांसह कार्यकर्त्यांनाही नागरिकांच्या त्रस्त प्रतिक्रियांचा अनुभव आला आहे.

खड्डय़ांचे काय?

राज्याचे राज्यमंत्री आणि डोंबिवली शहरातून भाजपचे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या प्रचाराचा बुधवारी रेल्वे स्थानकातून शुभारंभ केला. अनेक वर्षांपासून शहरातील केवळ एकमेव जलद वाहतुकीची सेवा असलेल्या रेल्वे स्थानकात सकाळपासूनच प्रवाशांचा मोठा राबता असतो. याच वेळेची संधी घेत सकाळी ७.३० वाजल्यापासून रवींद्र चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते रेल्वे स्थानकातील मधल्या पादचारी पुलावर उभे राहून जोरदार घोषणाबाजी करत आणि प्रवाशांना प्रचार पत्रक वाटत उभे होते. कार्यकर्त्यांकडून प्रचार पत्रक स्वीकारताना ‘साहेब पहले वेस्ट का रस्ता ठिक करो’, सर पत्रीपूल कधी तयार होणार, स्कायवॉक मोकळा करा, अशा विनविण्याही केल्या जात होत्या. प्रवाशांच्या मागणीवर भाजप कार्यकर्ते स्मित हास्य करत ‘बनायेंगे.. बनायेंगे’ अशा प्रतिक्रिया देत होते.

भ्रष्टाचारी आहेत सगळे..

या वेळी एका प्रवाशाने प्रचार पत्रक नाकारले. तसेच ‘शहरातील रस्त्यांवर जाऊन बघा, किती मोठे खड्डे पडले आहेत. सगळेच्या सगळे नेते भ्रष्टाचारी आहेत,’ अशी संतप्त प्रतिक्रिया या प्रवाशाने दिली. ही प्रतिक्रिया देत असताना या प्रवाशाचा आवाज टिपेला पोहोचला होता. त्यामुळे चव्हाण यांच्यासह स्थानकात उपस्थित असलेले प्रवाशीही अवाक् झाले.