जोडरस्त्यासाठीची जमीन पालिकेच्या ताब्यात; रेल्वे फाटकातील वाहतूक कोंडीही टळणार

कळवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान असलेल्या खारेगाव फाटकाजवळ उभारलेल्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला जोडरस्ते तयार करण्यासाठी महापालिकेच्या ताब्यात जमीन आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून अपूर्णावस्थेत असलेल्या उड्डाणपुलाचे काम त्यामुळे मार्गी लागणार आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होऊन पूल सुरू होईल, असा दावा पालिकेने केला आहे.

कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान खारेगाव फाटक असून तेथून मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे फाटकाजवळ रेल्वे गाडय़ा थांबविण्यात येतात आणि त्याचा परिणाम मध्य रेल्वेच्या मार्गावरील लोकल वाहतुकीवर होतो. कळवा पूर्व आणि पश्चिम या भागांना या फाटकांच्या माध्यमातून जोडण्यात आले आहे. कळवा पूर्व भागात आतकोनेश्वरनगर, घोलाईनगर, भास्करनगर, पौंडपाडा, शिवशक्ती हे परिसर येत असून त्या ठिकाणी लाखो नागरिक राहतात. या सर्वाना कळवा पश्चिम तसेच ठाणे शहरात येण्यासाठी फाटकातूनच प्रवास करावा लागतो. मात्र, फाटकातून रेल्वे रूळ ओलांडताना लोकल गाडीच्या धडकेत अनेकांचा मृत्यू झाला असून अशा घटना रोखण्यासाठी ठाणे महापालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून खारेगाव उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले होते. रेल्वेच्या जागेवर उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. मात्र त्याला जोडणाऱ्या जोडरस्त्यांचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले होते. जोडरस्त्यांची जागा महापालिकेच्या ताब्यात नसल्यामुळे हे काम रखडले होते. पूर्व बाजूची जागा मफतलाल कंपनीची होती. या जागेसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार महापालिकेने मफतलाल कंपनीला ३८ कोटी रुपये दिले आहेत, तर पश्चिम बाजूला असलेली खासगी जागा महापालिकेने ताब्यात घेतली आहे. यामुळे दोन्ही बाजूला जोडरस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मध्य रेल्वेलाही दिलासा

या पुलामुळे फाटकाजवळ होणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार असून यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. तसेच फाटकामध्ये वाहने बंद पडत असल्यामुळे मध्य रेल्वेच्या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प होते. उड्डाणपुलाचे काम झाल्यानंतर तेथून वाहनांची वाहतूक होणार असून यामुळे मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीस होणारा विलंब टळणार आहे.

खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाला दोन्ही बाजूला जोडरस्ते तयार करण्याच्या कामासाठी निविदा काढण्यात आली आहे. खारेगाव पुलाचे काम मार्गी लागल्याने नागरिकांना फायदा होणार असून लोकल विलंबही ठळणार आहे. – प्रवीण पापळकर, कार्यकारी अभियंता, ठाणे महापालिका