11 August 2020

News Flash

स्कायवॉकवरील तिकीट खिडकीला अखेर मुहूर्त

बदलापूर रेल्वे स्थानकालगतच्या स्कायवॉकवरील तिकीट खिडकी अखेर सुरू करण्यात आली आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकालगतच्या स्कायवॉकवरील तिकीट खिडकी अखेर सुरू करण्यात आली आहे.

‘लोकसत्ता ठाणे’च्या वृत्ताची दखल
काम पूर्ण होऊनही गेल्या काही महिन्यांपासून बंद अवस्थेत असलेली बदलापूर रेल्वे स्थानकालगतच्या स्कायवॉकवरील तिकीट खिडकी अखेर सुरू करण्यात आली आहे. ही तिकीट खिडकी बंद असल्याने तिकिटासाठी बदलापूरकर प्रवाशांना स्कायवॉकवरून तिकिटासाठी खाली उतरून मोठा फेरा मारावा लागत होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. यासंबंधीचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’मधून प्रसिद्ध होताच तिकीट खिडकी सुरू करण्यासंबंधीची लगबग वाढली होती.
गेल्या अनेक महिन्यांपासून ही तिकीट खिडकी सुरू व्हावी अशी मागणी प्रवाशांकडून होत होती. याबाबत ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये नुकतेच वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी तातडीने सूत्रे हलवली आणि शनिवारी ही तिकीट खिडकी अखेर प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. गेल्या काही वर्षांत बदलापूर शहराचे झपाटय़ाने नागरीकरण सुरू असून यामुळे येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांना ताण वाढू लागला आहे. या स्थानकात सध्या अस्तित्वात असलेल्या दोन तिकीट खिडक्यांवर मोठय़ा प्रमाणावर प्रवाशांच्या रांगा लागत असतात. त्यामुळे स्कायवॉकवरून रेल्वे स्थानक गाठणाऱ्या प्रवाशांना अनेकदा तिकिटासाठी खाली उतरून पुन्हा जिन्याने फलाटावर जावे लागत असे. हा द्राविडी प्राणायाम प्रवाशांचा मनस्ताप वाढविणारा होता. स्कायवॉकवरील तिकीट खिडकीने प्रवाशांचा हा त्रास कमी होणार आहे. तसेच इतर दोन्ही बाजूंना असलेल्या तिकीट खिडक्यांवरचाही ताण काही प्रमाणावर कमी होणार आहे. त्यामुळे उशिरा का होईना खिडकी सुरू झाल्याबाबत प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

आरक्षणही सुरू करा
स्कायवॉकवरील तिकीट खिडकी सुरू केल्यानंतर आता अतिरिक्त आरक्षण खिडकीची मागणी जोर धरू लागली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षात घेता अशी खिडकी उपलब्ध करून देणे काळाची गरज आहे, असे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाला विचारले असता, आमच्याकडे अतिरिक्त खिडकीसाठीची यंत्रणा आहे, मात्र त्यासाठी नोंदणी कर्मचारी उपलब्ध झाल्यास, हाही प्रश्न मार्गी लागेल, असे सांगण्यात आले.

वर्षभर तांत्रिक अडचण?
बंद तिकीट खिडकीबाबत ‘लोकसत्ता’च्या ठाणे वृत्तान्तमध्ये ७ एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर तातडीने तांत्रिक बाबी पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. याआधीही फक्त तांत्रिक बाबी अपूर्ण राहिल्याने तिकीट खिडकी सुरू होत नव्हती. मात्र वर्षभरानंतरही तांत्रिक बाबी पूर्ण होत नसल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण होते. यासंबंधीचे वृत्त ‘लोकसत्ता’मधून प्रसिद्ध होताच ही प्रक्रिया वेगाने सुरू झाली आणि त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला, अशी प्रतिक्रिया प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2016 5:38 am

Web Title: railway ticket window on badlapur railway station skywalk open
Next Stories
1 शहरबात ठाणे : क्रीडा क्षेत्राची घोर उपेक्षा
2 हत्याकांडाने विरार हादरले!
3 रेल्वे पादचारी पुलावर रक्तरंजित थरार
Just Now!
X