कोपर ते दिवादरम्यान रुळांना तडा
मध्य रेल्वे मार्गावर कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने गुरुवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळेस दिवापलीकडील रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल झाल्याचे चित्र दिसून आले. प्रवाशांच्या तुलनेत लोकलच्या फेऱ्या कमी असल्याने कल्याण, डोंबिवली स्थानकातील प्रवाशांना लोकलच्या दारावर लटकूनच प्रवास करावा लागत असतो. अशातच ऐन गर्दीच्या वेळेस मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाल्याने चाकरमान्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. बारावीची परीक्षा सुरू असताना सकाळच्या वेळेत हा प्रकार घडल्याने मुंबईच्या महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.
रेल्वे अर्थसंकल्प सादर होण्यास काही तासांचा कालावधी शिल्लक असताना हा प्रकार घडल्याने प्रवासी रेल्वे प्रशासनाच्या नावाने अक्षरश खडे फोडताना नजरेस पडत होते. अर्थसंकल्पाचे सादरीकरण होत असताना मुंबई आणि मध्य रेल्वेच्या पारडय़ात काय पडणार याविषयी प्रवाशांमध्ये कमालीची उत्सुकता होती. गुरुवारी पहाटे पडलेल्या दाट धुक्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर लोकल गाडय़ा पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत होत्या. यामुळे चाकरमान्यांनी नेहमीपेक्षा अर्धातास आधीच घर सोडून रेल्वे स्थानक गाठले. परंतु रेल्वे स्थानकात येताच कोलमडलेले वेळापत्रक पाहून प्रवाशांच्या पदरी निराशाच पडली. सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान दादर रेल्वे स्थानकादरम्यान एक्स्प्रेसच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे सेवा उशिराने धावत होती.
त्यात भरीस भर म्हणून सकाळी १०.०८ च्या सुमारास कोपर दिवा रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी १० च्या सुमारास रेल्वे रुळाला तडे गेल्याने रेल्वे सेवा पूर्णत ठप्प झाली. बारावीच्या परीक्षा सुरू असून रेल्वेने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची पुरती भंबेरी उडाली होती. परीक्षा केंद्रावर पोहोचणार कसे याची चिंता त्यांना लागल्याने अनेकांनी आपल्या शिक्षकांना आम्ही रेल्वेमध्ये अडकले असल्याचे सांगण्यास सुरुवात केली होती. १०.३५ च्या सुमारास रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, ऐन गर्दीच्या वेळेत वाहतूक बंद पडल्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला.