ठाणे जिल्ह्यात गुरुवारी दुपारपासून सतत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उपनगरीय रेल्वे मार्गावर पाणी साचून लोकल सेवा पूर्णपणे कोलमडली. पहाटेपासूनच सीएटीकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही दिशांची वाहतूक पूर्णपणे बंद झाली. ठाणे ते कल्याणदरम्यानची वाहतूक सुरू असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून केला जात असला तरी सुमारे एक ते दोन तासांच्या अंतराने एखादी लोकल या भागातून जात होती. लांब पल्ल्याच्या गाडय़ांचाही प्रचंड खोळंबा झाला होता. ठाण्यापासून कल्याणपर्यंत जागोजागी मेल एक्स्प्रेस गाडय़ा एकामागोमाग एक अडकून पडल्या होत्या. कल्याण स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. दुपारी उशिरापर्यंत ही परिस्थिती कायम होती. पाणी पूर्णपणे ओसरल्याशिवाय रेल्वे वाहतूक सुरळीत होऊ  शकणार नाही, अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे अनेक प्रवाशांनी घरीच जाणे पसंत केले.

’मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सकाळी रेल्वे वाहतुकीचा बोऱ्या वाजला. सीएसटी-ठाणेदरम्यानचा रेल्वे मार्ग बंद झाल्यामुळे ठाण्याच्या पलीकडून येणाऱ्या प्रवाशांना केवळ ठाण्यापर्यंत प्रवास करता आला.
’ठाणे स्थानकात उतरून मुंबईकडे जाण्याचा अन्य पर्याय नसल्याने प्रवाशांना ठाण्यातूनच पुन्हा घरी परतावे लागले.
’सकाळी कर्जत, कसाऱ्याकडून येणाऱ्या लोकल धिम्या गतीने रखडत ठाण्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत होत्या. मात्र जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे त्या रडतखडत जात होत्या.
’कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा आणि कळवादरम्यान रेल्वे रुळांवर जागोजागी पाणी साचल्याने लोकलचा वेगही अत्यंत कमी ठेवण्यात आला होता. त्यामुळे रेल्वे मार्गावर लोकल गाडय़ांची गर्दी उसळली.
लांब पल्ल्याच्या गाडय़ांची कोंडी
पावसामुळे मुंबईकडे येणाऱ्या व जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांची कोंडी झाली होती. अनेक गाडय़ा स्थानकापासून दूर अंतरावर थांबल्या होत्या आणि रुळांवरील पाण्यामुळे प्रवाशांना गाडीतून खाली उतरणेही शक्य होत नव्हते. त्यामुळे जवळच्या स्थानकात आल्यानंतर त्या गाडय़ा रद्द करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली होती. वातानुकूलित यंत्रणा असलेल्या डब्यांची बॅटरी बॅकअप संपल्याने प्रवाशांची आतमध्ये घुसमट झाली होती.
या गाडय़ा रखडल्या
चेन्नई एक्स्प्रेस, भुवनेश्वर एक्स्प्रेस, हुसेनसागर एक्स्प्रेस, अमरावती एक्स्प्रेस, गोंदिया एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस, पाटणा एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस.