पावसामुळे ठाण्यात खड्डे अवतीर्ण; वाहतूक कोंडीत भर, अपघातांच्या घटना

ठाणे : पावसाळ्याच्या आधी दोन महिन्यांपासून मान्सूनपूर्व तयारीच्या नावाखाली केली जाणारी कामे फोल ठरू लागल्याचे ठाण्यातील रस्त्यांच्या अवस्थेवरून दिसून येत आहे. शहरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून या खड्डय़ांत पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. या डबक्यांच्या खोलीचा अंदाज घेण्यासाठी वाहने सावकाश चालवल्यास वाहतूक कोंडी होत आहे, तर डबक्याचा अंदाज न आल्याने अपघात होण्याच्या घटनाही घडत आहेत.

ठाणे शहरातून मुंबई-नाशिक, तर घोडबंदर भागातून मुंबई-अहमदाबाद हे महामार्ग जातात. हे दोन्ही महामार्ग शहरातील अंतर्गत मार्गाना जोडण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीच्या दृष्टिकोनातून हे दोन्ही मार्ग महत्त्वाचे मानले जातात. मुंब्रा बाह्य़वळण दुरुस्ती कामामुळे गेल्या दीड महिन्यांपासून या दोन्ही महामार्गावर वाहनांचा भार वाढला आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी वाढली असतानाच रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे या कोंडीत भर पडत आहे.

गेल्या आठ-दहा दिवसांपासून लागून राहिलेल्या पावसामुळे सर्वच रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. मॉडेला चेकनाका या भागातील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. ठाणे स्थानक परिसरातील गोखले मार्गावरही खड्डे पडले आहेत. त्याचप्रमाणे घोडबंदर परिसरातील कापूरबावडी, कॅसलमिल, लोकमान्यनगर टीएमटी बस डेपो, चरई, कोरस कंपनी रस्ता, रहेजा गृहसंकुलापासून तीन हात नाका परिसराकडे जाणारा मार्ग, रस्ता क्रमांक १६ या मार्गावर खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांत पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. पाण्यामुळे या खड्डय़ांचा अंदाज येत नाही व त्यातून अपघाताच्या घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

आधीच अंधार, त्यात खड्डय़ांमुळे बेजार

ज्ञानेश्वरनगर ते कामगार रुग्णालयाचा नाका या परिसरात एका बाजूच्या रस्त्याचे काम सुरू आहे.त्यामुळे दुहेरी वाहतूक एकाच बाजूच्या रस्त्यावर सुरू आहे. स्थानक परिसरातून लोकमान्य नगरकडे जाताना मोठी वाहतूक कोंडी होते. रस्त्यावरील दिवे बंद असल्याने या रस्त्यातील खड्डे रात्रीच्या वेळी दिसत नाहीत. अशा वेळी अपघात होण्याची शक्यता असते, असे या ठिकाणाहून नियमित प्रवास करणारे विजय शिंदे यांनी सांगितले.

पावसामुळे खड्डे बुजवण्याचे काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे पाऊस उघडताच लगेचच खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या खड्डय़ांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे.

– अनिल पाटील, शहर अभियंता, ठाणे महानगरपालिका