पावसाच्या माऱ्यामुळे ठिकठिकाणी खड्डे; वाहतुकीत अडथळे, अपघातांची भीती

ठाणे : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्य़ातील सर्वच शहरांतील रस्त्यांची चाळण झाली आहे. पावसाच्या माऱ्यामुळे डांबर, खडी वाहून गेल्याने रस्त्यांमध्ये पाण्याची डबकी तयार झाली आहेत. अशा रस्त्यांवरून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलेल्या खड्डय़ांच्या खोलीचा अंदाज न आल्याने दुचाकी किंवा छोटी वाहने अडकून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

ठाण्यातील घोडबंदर तसेच  वागळे इस्टेट भागातील मुख्य तसेच अंतर्गत मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. तीन हात नाका चौकात खड्डे पडले असून यामुळे या चौकातून वाहतूक करणाऱ्या चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे. माजीवाडा चौक, मीनाताई ठाकरे चौक या ठिकाणीही खड्डे पडले असून यामुळे या चौकांमध्ये काही प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. घोडबंदरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाण पुलाच्या मार्गिकेवरही खड्डे पडले आहेत. भिवंडी येथील काल्हेर तसेच मानकोली परिसरातही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काल्हेर येथे ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. तसेच भिवंडीत मोठय़ा प्रमाणात गोदामे आहेत. त्यामुळे गोदामाच्या दिशेने जाणारे अनेक ट्रक-टेम्पो काल्हेर मार्गे वाहतूक करतात. मात्र, या मार्गावर खड्डे पडल्याने तसेच मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे. मुंब्रा येथील शिळफाटा मार्गावरील वाय जंक्शन, खान कंपाऊंड परिसरात खड्डे पडले असून यामुळे गुरुवारी सकाळी या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. डोंबिवलीतील मानपाडा, सुभाष रोड, कल्याण-मुरबाड मार्ग, बदलापूर आणि अंबरनाथमधील बारवी धरण रस्ता, शिरगाव रस्ता या ठिकाणी खड्डे पडले आहेत.  भिवंडीतील मानकोली तसेच अन्य भागात खड्डय़ांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.