जिल्ह्य़ातील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण

ठाणे : परतीच्या पावसामुळे जिल्ह्य़ातील ६८ टक्के म्हणजेच ७१ हजार ७०९ शेतक ऱ्यांच्या ३७ हजार ७९३ हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. यामध्ये मुरबाड, शहापूर आणि भिवंडी या तीन तालुक्यांमध्ये भातपिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्व शेतीच्या पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले असून यातील १७ हजार शेतकरी विमाधारक असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्य़ात पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे भात पिकाची मोठय़ा प्रमाणात लागवड केली जाते. ठाणे, अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड, शहापूर आणि कल्याण या सहा तालुक्यांमध्ये ५५ हजार हेक्टरवर या भाताचे पीक घेतले जाते. दरवर्षी जुलैअखेरीस आणि ऑगस्टच्या सुरुवातीच्या काळात ही लागवड पूर्ण केली जाते. यंदाही या कालावधीत भात पिकांची संपूर्ण लागवड पूर्ण झाली होती. पाऊसही प्रमाणात झाल्यामुळे यंदा विक्रमी उत्पन्न होण्याची शक्यता शेतक ऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. ऑक्टोबर महिन्यात ऐन कापणीच्या वेळी आलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्य़ातील ६८ टक्के म्हणजेच ३७ हजार ७९३ हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. जोरदार पावसामुळे शेतक ऱ्यांचे उभे पीक आडवे झाले, तर काही ठिकाणी कापणी झालेले पीक कुजून खराब झाले आहे.

जिल्ह्य़ातील नुकसान झालेल्या पिकांमध्ये ७१ हजार ७०९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांवरून अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये मुरबाड तालुक्यातील सर्वाधिक १३ हजार ९०२ हेक्टर, त्यापाठोपाठ शहापूर तालुक्यातील १२ हजार ११९ हेक्टर तर भिवंडी तालुक्यातील ५ हजार ७५८ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे.

नुकसानग्रस्त शेती

तालुका         शेतकरी        बाधित क्षेत्र (हेक्टर)

मुरबाड         २५५१५        १३९०२.८२

शहापूर         २२७१६        १२११९.१७

भिवंडी        १२१५९           ५७५८.०५

कल्याण       ४६४३           ३१९५.६४

अंबरनाथ       ५६८०        २५८७.५१

ठाणे            ९९६              २३०

एकूण        ७१७०९        ३७७३९.७९

परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील या सर्व नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्यात आले आहेत.

अंकुश माने, जिल्हा कृषी अधीक्षक