|| पूर्वा साडवीलकर

पावसामुळे दिवाळीचा उत्साह आटला; यंदाच्या वर्षी उद्योगधंद्यांना ५० टक्के फटका : – एकीकडे आर्थिक मंदीमुळे बाजारात मंदीचे सावट असल्याची कुणकुण सुरू असतानाच, गेल्या आठवडाभरापासून मुक्काम ठोकून असलेल्या परतीच्या पावसाने बाजारपेठेत मरगळ निर्माण केली आहे. ठाणे शहरातील गोखले, राम मारुती रस्त्यानजीकच्या बाजारपेठांत पावसामुळे ग्राहकांच्या उत्साहावर विरजण पडल्याचे दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारातील विक्री, व्यवसाय ५० टक्क्यांनी खालावल्याचे स्थानिक दुकानदारांचे म्हणणे आहे.

दिवाळी सुरू होण्याच्या एक आठवडय़ापूर्वीपासून बाजारपेठांमध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असते. यंदाच्या दिवाळीत हे चित्र दिसले नाही. ठाण्यात मुख्य बाजारपेठेत दोन आठवडय़ांपासूनच दिवाळीचा उत्साह असतो. गोखले, राम मारुती मार्गावर रोषणाई केली जाते. यंदाही हा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी व्यावसायिकांनी या बाजारपेठा रोषणाईने सजविल्या आहेत. मात्र, ग्राहकांचा उत्साह पूर्वीसारखा नाही असे दुकानदारांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांची गर्दी वाढत आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी काही भागांत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांमुळे वाहन कोंडीदेखील झाली. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ग्राहकांची संख्या कमी आहे, असे दुकानदारांचे म्हणणे आहे. पाऊस हे त्यामागील एक महत्त्वाचे कारण असल्याचा दावा केला जात आहे.

दिवेविक्रेते, कंदीलविक्रेते, रांगोळी आणि कपडे विक्रेते या व्यवसायांवर पावसामुळे फार नुकसान होत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती उद्भवली होती. परिणामी, भाजीपाल्यांसह अनेक वस्तूंचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. ठाणेसह उपनगरांमध्ये दिव्यांची आवक ही जास्त प्रमाणात गुजरातमधून होत असते. मात्र, या वर्षी गुजरातमध्ये पुरस्थिती उद्भवली होती. कुंभारकाम करणाऱ्या व्यावसायिकांच्या दुकानात पाणी शिरल्यामुळे मातीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. परिणामी, यंदाच्या दिवाळीत बाजारात दिव्यांची आवक कमी झाली आहे. ऐन दिवाळीच्या दिवसांतदेखील पाऊस पडत असल्यामुळे या दिव्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. पावसामुळे ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडण्याचे टाळत आहेत. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी दिवे विक्रेत्यांच्या व्यवसायांमध्ये ५० टक्क्यांनी घट झाली असल्याचे दिवे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे. तसेच, प्लास्टिकवर बंदी असल्यामुळे यंदाच्या वर्षी अनेक कंदील विक्रेत्यांनी कागदी कंदील आणि मातीचे कंदील बाजारात उपलब्ध केले आहेत. परंतु, पावसामुळे ग्राहक प्लास्टिक कंदिलाची मागणी करत आहेत, त्यामुळे हे कंदील विक्रेत्यांची तारांबळ उडत आहे.

आर्थिकमंदी बरोबर पावसाचा फटकादेखील यंदाच्या दिवाळीत बाजारपेठांवर झाला आहे. पावसामुळे अनेकांनी खरेदी करण्यासाठी बाहेर पडायचे टाळले आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत बाजारपेठा थंडावल्या आहेत. – मुकेश सावला, अध्यक्ष, ठाणे व्यापारी उद्योग महासंघ