ठाणे : राज्याच्या हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार बुधवार पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडवली. पहिल्याच पावसाने ठाणे शहरासह कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी शहरासह ग्रामीण भागांत दाणादाण उडाली. रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला, तर अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. जिल्ह्य़ातील शहरांमध्ये अनेक ठिकाणी नाले तुंबल्याने पालिका प्रशासनांचे नालेसफाई केल्याचे दावे फोल ठरले. काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू असल्याने घरून काम करणाऱ्यांचे हाल झाले.

ठाणे शहरातील वृंदावन सोसायटी, यशस्वीनगर, कापूरबावडी, चितळसर मानपाडा बस थांबा, वागळे इस्टेट दत्त मंदिर, रूपादेवी पाडा, कळवा येथील खारेगाव महापालिका उद्यान, जांभळीनाका बाजारपेठ, वर्तकनगर, दिवा येथील आगासन-बेडेकरनगर, मुंब्रा-शिळ रोड अशा ४७ ठिकाणी पाणी साचले होते. मुंब्रा बाह्य़वळण मार्गाजवळ दोन ठिकाणी दरड कोसळली. मुंब्रा येथील घासवाला कंपाउंड परिसरात संरक्षक भिंत एका घरावर कोसळली. या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. दिवा येथील बेडेकरनगर, साईबाबानगर, मातोश्री नगर, ओमकारनगर, वक्रतुंडनगर, साबेगाव यांसह इतर भागांतील घरांमध्ये नाले आणि पावसाचे पाणी शिरले. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेकांचे घरातील वस्तूंचे नुकसान झाले. चिरागनगर, नौपाडय़ातील भांजेवाडी, चिखलवाडी, कोपरीतील ठाणेकरवाडी, साईनाथनगर तसेच इतर भागांतील घरांमध्येही पाणी शिरले होते. नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्यामुळे या ठिकाणीही पाणी साचल्याचा आरोप होत आहे. कावेसर भागातील गृहसंकुलामध्येही पाणी साचले होते. वृंदावन परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना बाहेर पडता येत नव्हते. पाणी साचलेल्या भागात पंप लावून पाण्याचा निचरा करण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सुरू होते.

नौपाडा, माजीवडा, वागळे इस्टेट, मुंब्रा कौसा या भागांत सहा ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. सावरकरनगर आणि ढोकाळी भागात गृहसंकुलाची संरक्षक िभती कोसळून त्यात वाहनांचे नुकसान झाले. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने अनेक ठिकाणी साचल्या पाण्याचा निचरा झाला. भिवंडी शहरातही अशीच परिस्थिती होती. भिवंडी ग्रामीणमधील कशेळी, काल्हेर भागांत रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले.