महानगरपालिका मुख्यालयातील प्रकार; महानगरातील विकासकांकडूनही अटींना बगल

लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्यालयात पाणीपुरवठा विभागामार्फत पर्जन्य जलसंधारण (रेन हार्वेस्टिंग) प्रकल्प सुमारे १२ वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे. या प्रकल्पात पावसाचे पाणी साचण्याबरोबरच जमिनीच्या आत रुजणेदेखील आवश्यक आहे. परंतु पालिकेच्या या प्रकल्पात पाणी जमिनीत रुजण्याऐवजी साठत असल्यामुळे  प्रकल्पाची योजना गेल्या १० वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात पाण्याची समस्या अतिशय जटिल होत चालली आहे. या समस्येला दूर करण्याकरिता राज्य सरकारने पर्जन्य जलसंधारण प्रकल्प संकल्पनेवर भर दिला आहे.  २००२ साली मीरा-भाईंदर महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर पालिका प्रशासनाने सन २००८ मध्ये मुख्यालयाच्या एका छोटय़ा बागेत पर्जन्य जलसंधारण प्रकल्प तयार केला होता. एवढेच नव्हे तर शहरातील सर्व इमारतींना बांधकाम परवानगी देताना बांधकाम प्रारंभ पत्र (सीसी) मध्ये रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबवणे बंधनकारक केले. मात्र अद्यापही अनेक विकासक या प्रकल्पाकडे दुर्लक्ष करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पालिका मुख्यालयात सुरू झालेल्या पर्जन्य जलसंधारण प्रकल्पात साचलेले पाणी जमिनीत रुजण्याऐवजी तयार करण्यात आलेल्या टाकीमध्ये साचले जात आहे. त्यामुळे प्रकल्प सुरू ठेवणे प्रशासनाला शक्य नसल्यामुळे बंद ठेवण्यात आला आहे तर केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षपणा मुळे हा प्रकल्प बंद असल्याची तक्रार पर्यावरण प्रेमींकडून होत आहे.

विकासकांना प्रोत्साहित करण्यासाठी कर सूट 

शहरातील विकासकांमार्फत हा प्रकल्प राबवण्यात यावा म्हणून पालिका प्रशासनाने बांधकाम व्यावसायिकांना सर्वसाधारण करामध्ये ५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पालिकाच या प्रकल्पाला गांभीर्याने घेत नसल्यामुळे इतर विकासक भूजल स्रोतांच्या संवर्धनासाठी महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाकडे दुर्लक्षपणा करत आहे.

कधी कधी यात तांत्रिक बिघाड घडून येतो. अन्यथा हा प्रकल्प कार्यरत आहे.
– सुरेश वाकोडे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग