अंबरनाथमधील महिलांचा आदर्श उपक्रम

घरात एखादे अत्यावश्यक आणि खर्चाचे काम निघाले की, कुटुंबातील महिला स्वत: साठवलेले पैसे किंवा स्वत:चे दागिने मदतीसाठी पुढे करत असतात. तशाच पद्धतीने अंबरनाथमधील एका इमारतीत कार्यरत असलेल्या महिला बचतगटाने पर्जन्य जलसंधारण प्रकल्प राबविण्यासाठी सोसायटीला एक लाख रुपयांचे कर्ज दिले. त्यामुळेच पावसाळ्यापूर्वी प्रकल्पाचे काम पूर्ण करून या सोसायटीने जमिनीत पाणी मुरविण्याची व्यवस्था केली आहे.

यंदा अपुऱ्या पावसामुळे शहरी भागात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवले. अनेक कूपनलिका आटल्याने गृहनिर्माण सोसायटय़ांच्या तोंडचे पाणी पळाले. अंबरनाथच्या वडवली विभागातील कैलासधाम ही त्यापैकीच एक सोसायटी. दहा वर्षांपूर्वी सोसायटीने खोदलेल्या कूपनलिकेला गेल्या वर्षीपर्यंत मुबलक पाणी होते. त्यामुळे या तीन मजली इमारतीतील २३ कुटुंबांना कधी पाण्याची चिंता भेडसावली नाही. मात्र यंदा अपुऱ्या पावसामुळे साठ टक्के पाणीकपात असताना नेमकी कूपनलिका कोरडी पडली. त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था झाली. सोसायटीत गेली काही वर्षे पर्जन्य जलसंधारण करून घेण्याबाबत चर्चा होत होती. मात्र खर्चाच्या कारणाने त्याबाबतीत ठोस निर्णय होत नव्हता. अखेर कूपनलिका आटल्याने या चर्चेला गती आली. मात्र तातडीने इतके पैसे कसे उभे करावे, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांना पडला. कारण सोसायटीच्या गंगाजळीत असलेला निधी पुरेसा नव्हता. तेव्हा सोसायटीतील महिलांनीच त्यावर उपाय शोधला. कैलासधाम सोसायटीत महिलांचा ‘राणी लक्ष्मीबाई महिला बचत गट’ आहे. गटातील महिला दर महिना प्रत्येकी ५०० रुपये वर्गणी काढतात. एकमेकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते पैसे वापरले जातात. बचत गटाने पर्जन्य जलसंधारण प्रकल्पासाठी सोसायटीला एक लाख रुपयांचे कर्ज दिले आणि त्यातून गेल्या महिन्यात काम पूर्णही झाले.

सोसायटीतील एकमेकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठीच बचत गट स्थापन केला आहे. यापूर्वीही इमारतीच्या छतावर छप्पर टाकण्यासाठी आम्ही सोसायटीला कर्ज दिले होते. पर्जन्य जलसंधारणाचे काम पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक होते. त्यामुळे सोसायटीला तातडीने पैसे दिले. त्यामुळे वेळेत हे काम पूर्ण झाले, याचे समाधान आहे.

– आशा भोंबे, अध्यक्षा, राणी लक्ष्माबाई महिला बचतगट.