गटार सफाई मोहीम फोल; अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी

ठाणे शहरात सोमवारी रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांत पाणी तुंबल्याने महापालिकेची गटार सफाई मोहीम फोल ठरल्याचे दिसून आले. लोकमान्यनगर, वर्तकनगर आणि कळवा या परिसरातील १३ ठिकाणी पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिकांची तारंबळ उडाली. शहरात २६ ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर सात ठिकाणी झाडाच्या फांद्या निखळल्याच्या घटना घडल्या. सोसाटय़ाच्या वाऱ्याचा इशारा असतानाही महापालिकेने वृक्ष छाटणीकडे दुर्लक्षच केल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.

ठाणे शहरामध्ये सोमवारी रात्री पहिल्या पावसाने हजेरी लावली. रात्री साडेनऊ वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री साडेदहा वाजेपर्यंत पाऊस सतत सुरू होता. त्यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली. या एका तासांच्या कालावधीत ठाणे शहरामध्ये ५३.५९ मिमी पावसाची नोंद झाली. सोसाटय़ाचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागांत पाणी साचले होते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात वाहने बंद पडत होती. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली.

पहिल्या पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी अनेक जण रस्त्यावर उतरले होते. ठाण्यातील इंदिरानगर, लोकमान्यनगर, यशोधननगर, सावरकरनगर, नितीन कंपनी, खोपट, ज्ञानेश्वरनगर, कळवा भागात वीजपुरवठा खंडित झाला होता, तर नौपाडा, कापुरबावडी, बाळकुम, वंदना सिनेमा, खोपट या ठिकाणी रस्त्यावर सुमारे गुडघाभर पाणी साठले होते. त्यामुळे कामावरून घरी परतत असलेल्या नोकरदार वर्गाला मनस्ताप सहन करावा लागला.

ठाणे शहराच्या विविध भागांत पावसाचे पाणी साचले होते. काही ठिकाणी पावसाचे पाणी घरात शिरल्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याचे प्रकारही घडले. या संदर्भात ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे एकाच दिवसात ७३ हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामध्ये २६ तक्रारी झाडे उन्मळून पडल्याच्या तर सात तक्रारी झाडाच्या फांद्या पडल्याच्या आहेत. १३ ठिकाणी पाणी तुंबल्याच्या आणि उर्वरित अन्य तक्रारींचा समावेश आहे, तसेच सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे विद्युत यंत्रणा कोलमडून पडली होती. त्याचा परिणाम मंगळवारी सकाळी दिसून आला. त्यामुळे कॅडबरी आणि अल्मेडा मार्गावरील सिग्नल यंत्रणा बंद असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

कुठे पाणी तुंबले?

  • कळवा वाघोबानगर येथील रेल्वे रुळाजवळील वस्ती, वर्तकनगर, शिवाईनगर, गणेशनगर, भीमनगर आणि चंदनवाडी या भागातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते.
  • आतकोनेश्वरनगर या भागात नाल्याचे पाणी काही घरांमध्ये शिरले होते.
  • घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपुलाखाली पाणी साचले होते. याच भागात आयुक्त संजीव जयस्वाल यांचे निवासस्थान असून या परिसरात पातलीपाडा उड्डाणपुलाखाली साचलेले पाणी वाहून येत होते. त्यामुळे या भागातही पाणी साचले होते.
  • जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान लुईसवाडी भागात असून या ठिकाणीही पावसाचे पाणी साचले होते.

तक्रारींचा पाऊस

ठाणे शहरातील हाजुरी पोलीस चौकी, लुईसवाडी आणि ब्रह्मांड या तीन ठिकाणी तेल सांडल्याच्या तक्रारी महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या, तसेच नौपाडय़ातील भास्कर कॉलनी, सिद्धेश्वर तलाव आणि हरिनिवास सर्कल या तीन ठिकाणी आग लागल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. तसेच रेमंड कंपनीजवळील होर्डिग धोकादायक झाल्याची तक्रारीही प्राप्त झाली आहे.

नालेसफाईची पोलखोल..

वर्तकनगर येथील जुन्या म्हाडा कॉलनीजवळ असलेल्या नाल्यातील पाणी नागरिकांच्या घरात शिरले होते. त्यामुळे घरात आणि रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक कचरा साचला होता. हा कचरा नागरिकांना स्वत: साफ करावा लागला, तर आंबेडकर रोड परिसरातील नाल्याचे पाणीही नागरिकांच्या घरात शिरले होते. या परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. वाघोबानगर आणि आतकोनेश्वरनगर या भागात नाल्याचे पाणी काही घरांमध्ये शिरले होते. त्यामुळे पहिल्याच पावसात शहरातील नालेसफाईची पोलखोल झाल्याची चर्चा आहे.