News Flash

पावसाची झोडपणी सुरूच

टिटवाळा पूर्वेकडील हनुमान मंदिराजवळील जुना वटवृक्ष रविवारी रात्री उन्मळून पडला.

वाहतूक संथगतीने, झाडांची पडझड, रस्ता खचण्याच्या घटना

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ाच्या शहरी तसेच ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर सोमवारी दिवसभर कायम होता. या पावसामुळे शहराच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतुक संथगतीने सुरु होती. तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने त्यात वाहनांचे नुकसान झाले आहे. दिवा परिसरात तुंबलेल्या नाल्याचे पाणी घरांमध्ये शिरल्यानंतर प्रशासनाने भर पावसात नालेसफाईचे काम हाती घेतले. घोडबंदर भागातील नवीन अंतर्गत रस्ता खचल्याची बाब उघडकीस आली असून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पालिकेने हाती घेतले आहे.

ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सलग तिसऱ्या दिवशीही म्हणजेच सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. ठाणे शहरातील पाचपाखाडी, उपवन, समता नगर, कोपरी, सावरकर नगर या सहा ठिकाणी वृम्क्ष उन्मळून पडले असून त्यामध्ये पाचपाखाडी भागात तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. तर दिवा, नौपाडा यासह शहराच्या विविध सखल भागांमध्ये पाणी साचले होते. मुंब्रा येथील अमृतनगर भागातील इमारतीमधील घराच्या छप्परचे प्लॅस्टर कोसळून एक जण किरकोळ जखमी झाला आहे. शहरातील महामार्ग तसेच अंतर्गत मार्गावर पावसामुळे वाहतुक संथगतीने सुरु होती. त्यात ठाणे ते माजिवाडय़ापर्यंतच्या महामार्गावरील रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहनांचा वेग मंदावल्याने याठिकाणी कोंडी होत होती. त्याचप्रमाणे जिल्ह्य़ाच्या शहरी आणि ग्रामीण भागात पावसाचे पाणी साचले होते तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. टिटवाळा पूर्वेकडील हनुमान मंदिराजवळील जुना वटवृक्ष रविवारी रात्री उन्मळून पडला. सावरकर नगर भागात मुख्य रस्त्यावर झाड कोसळले. मोहने एनआरसी वसाहतीत मुख्य रस्त्यावर एक झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद झाली. अग्निशमन जवान, आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी झाडे रस्त्याच्या बाजुला करण्याची कामे सुरू केली आहेत.

पाणी तुंबल्यानंतर गटार सफाई

गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे दिवा भागातील नाले तुंबले. या तुंबलेल्या नाल्याचे पाणी सद्गुरु वाडी, समर्थ नगर, बी.आर. नगर, श्री स्मरण ते अथर्व प्लाझा, सद्गुरु बंगला, के.जे. कॉम्पलेक्स आणि भारत सुपर किड्स शाळा या परिसरातील घरांमध्ये शिरले. दरम्यान, दिवा भागात ज्या ठिकाणी पाणी तुंबले आहे, तेथील गटारे साफ करण्याचे काम हाती घेतले असून याठिकाणी नालेसफाईच्या कामासाठी रोबोट तैनात केल्याची माहिती दिवा विभागाचे सहायक आयुक्त महादेव जगताप यांनी दिली.

बदलापुरात पाणी साचले

संततधार पावसामुळे बदलापूर शहरात रेल्वे स्थानकाबाहेर सलग पाचव्या दिवशी बाजारपेठ भागात पाणी साचले होते. तर शेजारच्याच सर्वोदय नगर भागात एक भिंत कोसळली. मात्र त्यात जिवीतहानी झाली नाही. उल्हास नदीकिनारी चौपाटी भागात पाणी पातळी वाढल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

या पावसाचा रस्ते वाहतूकीलाही मोठा फटका बसला. कल्याण-बदलापूर रस्त्यावर ठिकठिकाणी कोंडी पहायला मिळाली. फॉरेस्ट नाका परिसरात सकाळी अकराच्या सुमारास मोठी कोंडी झाली होती. तर अंबरनाथ पश्चिमेतील मटका चौक, पालिका मु्ख्यालय, विमको नाका या भागात दुपारी बाराच्या सुमारास मोठी कोंडी पहायला मिळाली.

नवीन रस्ता खचला

घोडबंदर येथील आनंदनगर भागात ३० किमी लांबीचा नवीन अंतर्गत रस्ता तयार करण्यात आला असून त्यापैकी चार किमी अंतरापर्यंतचा रस्ता खचला आहे. दरम्यान, हा रस्ता १५ ते २० फुट खोदून त्याठिकाणी मलवाहीन्या टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर भराव टाकून रस्त्याचे काम करण्यात आले होते. पावसामुळे हा भराव दबला गेल्याने हा रस्ता खचला असून त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे, अशी माहिती महापालिकेचे नगर अभियंता रविंद्र खडताळे यांनी दिले. संबंधित ठेकेदाराकडून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत असल्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 2:49 am

Web Title: rains lash thane heavy rain in thane heavy rainfall in thane zws 70
Next Stories
1 धरणक्षेत्र तहानलेलेच!
2 वसईचा पाणी पुरवठा बंद
3 आषाढीसाठी एसटीच्या ८४ विशेष बसगाडय़ा
Just Now!
X