पावसाचा जोर ओसरल्याने धरणांचे दरवाजे उघडलेच नाहीत

मुसळधार पावसामुळे तानसा, वैतरणा आणि मध्य वैतरणा ही धरणे तुडूंब भरल्याने धरणांचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मंगळवारी रात्री धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार होते. मात्र मंगळवारी संध्याकाळपासून पावसाचा जोर ओसरल्याने धरणांचे दरवाजे उघडण्यात आले नाहीत. धरणांचे दरवाजे उघडले असते, तर पालघर व ठाणे जिल्ह्यातील ४५ गावांना पुराचा धोका होता, मात्र धरणांचे दरवाजे न उघडल्याने या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे ठाणे आणि पालघर जिल्ह्यत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यत मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे तानसा, वैतरणा आणि मध्य वैतरणा या दोन्ही धरणांच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली होती. मंगळवारी रात्री पावसाचा जोर असाच कायम राहिला तर तीन्ही धरणांचे दरवाजे उघण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे तीनही धरणांच्या परिसरातील तसेच नदी किनाऱ्यावरील ४५ गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. मात्र जोर ओसरल्याने धरणांची दारे उघडण्यात आली नाहीत. मंगळवारी पहाटे केवळ तानसा धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता. यामुळे या भागातील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

 अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

पालघरचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये आणि संयम पाळावा, असे आवाहन केले आहे. पालघर जिल्ह्य़ातील सर्व धरणे सुरक्षित आहेत. धामणी धरण आणि कवडास बंधाऱ्याने धोक्याची पातळी गाठलेली नाहीत, असे त्यांनी सांगितले. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली तरी आम्ही सज्ज आहोत, असेही ते म्हणाले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे ते म्हणाले.