कल्याण डोंबिवली महानगरांचा परीघ दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक नवनवी गृहसंकुले उभी राहत आहेत. त्यामुळे शहराचा चेहरा दिवसेंदिवस बदलत आहे. मात्र काही जुनी संकुले तीन-चार दशकांपूर्वीच्या डोंबिवली शहराची ओळख म्हणून दिमाखाने उभी आहेत. पूर्वेकडची राजहंस ही त्यापैकीच एक सोसायटी.

राजहंस सोसायटी, मानपाडा रोड, डोंबिवली (पू.)
१५-२० वर्षांपूर्वीचा विचार केला तर कल्याण-डोंबिवली शहरात तळमजला अधिक तीन ते चार मजली इमारती उभ्या होत्या. सात ते आठ इमारतींच्या गृहसंकुलाभोवती बरीच मोकळी जागा होती. त्यामुळे घरात हवा खेळती असायची. खिडकीतून निसर्गाचे रम्य असे दृश्य दिसत असे. मात्र हे सुख फार काळ टिकले नाही. जसजसा काळ सरत गेला, तसतसा मोकळ्या जागेत नवी बांधकामे उभी राहिली. त्यामुळे पूर्वीच्या टुमदार शहराची रया आता गेली, असे जुने डोंबिवलीकर सांगतात. त्या जुन्या जमान्यापैकी ज्या काही खुणा शिल्लक आहेत, त्यापैकी एक म्हणजे पूर्वेतील राजहंस सोसायटी. रेल्वे स्थानकापासून अगदी हाकेच्या अंतरावर हे संकुल असून सर्व सोयी सुविधा त्यांच्या जणू दारातच उभ्या आहेत. असे असले तरी काही सुविधांच्या अभावी मात्र येथील नागरिक त्रस्त आहेत.
डोंबिवलीतील रहिवासी डॉ. पी.ए. शेटे, डॉ. प्रभुदेसाई यांनी १९७० मध्ये स्थानक परिसरात राजहंस संकुलाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. गणपतराव सामंत यांच्याकडून जमीन खरेदी करण्यात आली. त्यानंतर १९७१ मध्ये संकुलाचे बांधकाम सुरू झाले आणि १९७३ मध्ये पूर्ण झाले. शहरातीलच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक येथे राहायला आले. त्याकाळी चार रस्त्यापर्यंत सीमेंट कॉंक्रीटचा रस्ता होता. त्यापुढील रस्ता हा कच्चा होता, आजूबाजूला हिरवळ होती. गर्द झाडांच्या परिसरात तळमजला अधिक दोन मजली हे संकुल उभे राहिले. या संकुलात सात विंग असून ३५ सदनिका व २५ दुकाने आहेत. स्टेशनपासून मोक्याच्या ठिकाणी ही जागा असल्याने या जागेला आता सोन्याचा भाव आला आहे. २५ हजार रुपये किमतीत खरेदी केलेल्या या सदनिकांची किंमत आजच्या घडीला ६० लाखांच्या घरात पोहोचली आहे.
संकुलाच्या जवळच टिळकनगर प्रभाग असल्याने येथील मुलांना शाळेसाठी लांबची पायपीट करावी लागत नाही. स.वा.जोशी., टिळकनगर विद्यालय या शाळा जवळपास आहेत. रुग्णालय, भाजी मंडई, हॉटेल्स, किराणा मालाची दुकाने, कपडे लत्ते सारे हाकेच्या अंतरावर आहे. तसेच स्टेशनही जवळच असल्याने मध्यमवर्गीय नागरिकांनी या संकुलात घर खरेदी करणे पसंत केले. अनेकांनी कर्ज काढून येथे घर घेतल्याचे येथील जुने रहिवासी श्रीनिवास जोशी सांगतात. बहुतेक मध्यमवर्गीय मराठी भाषिक कुटुंबे येथे राहतात. मात्र या संकुलातील एक ठळक उणीव म्हणजे मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही. संकुलाजवळ पूर्वी मैदान असल्याने मुले तेथे खेळावयास जात असत. तेथे आता बांधकाम झाले आहे, शिवाय संकुलाच्या आजूबाजूच्या जागेतही अनेक बांधकामे झाली असल्याने मोकळी जागाच राहिलेली नाही. संकुलाला आवारही जास्त नसल्याने मुलांना खेळण्यासाठी गच्चीचा आसरा घ्यावा लागतो. तसेच वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता प्रत्येक घरात एक किंवा दोन वाहने असतात. संकुलाला वाहन पार्किंगची सुविधाच नाही. संकुल उभारणीच्या वेळी ही गोष्ट लक्षात आली नाही. कारण त्याकाळी वाहनांची संख्या एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नव्हती. संकुलाच्या परिसरात दुकाने असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था संकुलात आहे. शिवाय सुरक्षा भिंत सुरुवातीला संकुलाला नसल्याने येथे पाण्याचे मीटर चोरीला जाणे, शौचालयाचे कुलूप चोरीला जाणे अशा घटना घडत होत्या. त्यावर उपाय म्हणून आम्ही सुरक्षा भिंत बांधून घेतली. मागच्या बाजूचे संकुलाचे गेट बंद करून टाकले. या संकुलात कोणतीही सीसीटीव्ही यंत्रणा अथवा सुरक्षारक्षक तैनात नाही. असे असतानाही संकुलातील रहिवाशांच्या घरी किंवा दुकानांत चोरी झाल्याची घटना कधी घडली नाही.
राजहंस को.ऑप.हौ.सोसायटीची कमिटी दरवर्षी बदलते. सध्या व्ही.आर. देशपांडे अध्यक्ष आहेत, तर सचिव एस.के. गाडे, खजिनदार प्रशांत विद्वांस आहेत. प्रशांत विद्वांस सांगतात, दरवर्षी सोसायटीची कमिटी बदलते. जास्त करून ज्येष्ठ नागरिक येथे राहावयास आहेत. कमिटीमध्येही त्यांचा समावेश असल्याने त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हा तरुणांना मिळते. या जुन्या पिढीच्या अनुभवांचा नक्कीच फायदा होतो. आमच्या सोसायटीला आता ४५ वर्षे होत असून त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे या सदस्यांचे काटेकोरपणे लक्ष असते. आत्तापर्यंत दोनदा संकुलाची डागडुजी झालेली आहे. शिवाय स्ट्रक्चरल ऑडिटही करण्यात आले आहे. संकुल वर्षांला कल्याण-डोंबिवली महापालिकेला ५६ हजार रुपये कर भरते. इमारत जुनी झाल्याने पावसाचे पाणी भिंतीत मुरण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे इमारतींवर पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे.
पार्किंगचा अभाव, वाहतुकीची डोकेदुखी
पार्किंगची सुविधा नसल्याने इमारतीतील रहिवाशांना रस्त्यावर आपली वाहने उभी करावी लागत आहेत, परंतु याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नाहीे. संकुल हे मुख्य रस्त्याला लागून आहे, या चार रस्त्यावरून वाहनांची दिवसरात्र वाहतूक सुरू असते. त्यामुळे वाहनांच्या आवाजाचा आणि धुराचा आम्हाला प्रचंड त्रास आहे. वाहनचालक वाहतुकीची योग्य ती शिस्त पाळत नसल्याने आज आपल्याकडे या समस्या उद्भवल्या आहेत. समोरच सिग्नल यंत्रणा आहे. तिथे वाहतूक पोलीस उभे असतात. चार रस्ता असल्याने वाहतूक कोंडी काही प्रमाणात होणार हे माहीत असूनही चालक मोठमोठय़ाने हॉर्न वाजवत असतात. काही बाईकस्वार येथील रस्त्यावरून सुसाट वेगाने गाडी चालवितात. याचा ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना त्रास होतो. त्यांना पटकन वाहन कोठून आले आहे हे लक्षात येत नसल्याने अनेकदा अपघात घडतात. वाहनांच्या या सततच्या वर्दळीमुळे घरात प्रचंड धूळ येते. त्यामुळे घराच्या खिडक्या सतत बंद ठेवाव्या लागतात. शिवाय या वाहनांच्या धुरामुळेही अनेक ज्येष्ठांना त्याचा त्रास होतो. पिण्याच्या पाण्याची समस्या आम्हाला भेडसावत नाही. सध्या सर्वत्रच पाणीटंचाई असल्याने थोडेफार प्रश्न निर्माण होतात. सांडपाण्यासाठी संकुलात पूर्वी टाक्या बसविण्यात आल्या आहेत. सांडपाणी वाहून नेण्यासाठी भुयारी मलवाहिन्या टाकलेल्या असल्याने टाक्यांच्या जागेचा वापर इतर कामांसाठी होतो.

होर्डिग्ज्चा विळखा
मुख्य रस्त्याला लागून आमची सोसायटी आहे. चार रस्ता संकुलाच्या कोपऱ्यावरच असल्याने येथे राजकारणी लोक मोठमोठे होर्डिग्ज् लावतात. कार्यक्रम संपला तरी हे होर्डिग्ज काढले जात नाहीत. त्यामुळे आम्हाला प्रचंड त्रास होतो. नातेवाईकांना संकुलाचा पत्ता सांगायचा म्हटले तर दुकानांची नावे सांगावी लागतात. जसे की फडके वॉच सेंटरसमोर, परंतु या होर्डिग्जमुळे दुकानांची नावेच दिसत नाहीत. यामुळेही नातेवाईकांना संकुल शोधताना अडचणी येतात. पालिकेने अशा प्रकारे मोठमोठे होर्डिग्ज् लावण्यावर बंदी करावी. किंवा कार्यक्रम संपताच ते काढायला लावावेत, असे आवाहन श्रीनिवास जोशी यांनी केले. सुरुवातीला संकुलात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असत, परंतु कालांतराने त्यात खंड पडला असून कोणतेही कार्यक्रम आता होत नाहीत. याची खंत वाटत असली तरी काही घटनांमुळे आम्ही हा निर्णय घेतल्याचे येथील रहिवासी सांगतात. कोणतेही सण उत्सव साजरे न करताही येथील नागरिकांना एका आपुलकीने एकमेकांशी बांधून ठेवले आहे. आम्हाला एकत्र येण्यासाठी कोणत्याही निमित्ताची गरज नाही. आमच्यामधील पूर्वीचे स्नेहसंबंध, नात्यातील ओलावा अजूनही टिकून आहे. शिवाय ज्येष्ठांचे मोलाचे मार्गदर्शन असल्यानेच संकुलातील एकोपा टिकून आहे, असे रहिवाशांचे मत आहे.