पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

बेस्ट डिल टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या ऑनलाइन कंपनीच्या माध्यमातून २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला उद्योजक राज कुंद्रा आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी शुक्रवारी ठाणे सत्र न्यायालयात हजर झाले. सुनावणीनंतर न्यायालयाबाहेर पडताना कुंद्रा याने आपणास धमकाविल्याची तक्रार या प्रकरणातील तक्रारदार रवी भलोटिया यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरा नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या ‘बेस्ट डिल टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीने ऑनलाइनद्वारे विक्री केलेल्या बेडशीटच्या मालाचे २४ लाख रुपये आपणास दिले नसल्याची तक्रार रवी भलोटिया यांनी भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्यात नोंदवली होती. पोलीस ठाण्यात या प्रकरणी कुंद्रा दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून अटकपूर्व जामीनही मिळाला आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीसाठी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी शुक्रवारी ठाणे न्यायालयात हजर झाले होते. दरम्यान, सुनावणीची प्रक्रिया संपताच न्यायालयाबाहेर पडलेल्या कुंद्रा यांनी आपणास न्यायालयाच्या आवारातच  ‘१०० कोटी रुपये तयार ठेव’ असा इशारा करून धमकी दिल्याची तक्रार भलोटिया यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. या प्रकरणी राज कुंद्रा याच्याविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच राज कुंद्रा याने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत भलोटिया यांच्यावर १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता.