‘हॉट डॉग’ हा पाश्चिमात्य पदार्थ भारतीयांना फार रुचल्याचं दिसत नाही. त्यामुळे आपल्याकडे बर्गर, पिझ्झा, फ्रँकी हे पदार्थ जितके लोकप्रिय झाले तितकी लोकप्रियता अजून तरी ‘हॉट डॉग’ला मिळालेली नाही. एकतर त्याच्या नावातच गोंधळ आहे आणि दुसरं म्हणजे (थोडासा) चवीतही. पण उल्हासनगरमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून ‘हॉट डॉग’ या नावाला थोडा ट्विस्ट देऊन ‘हॉड डॉग’ विकला जातोय आणि हा पदार्थ उल्हासनगरवासीयांच्या सर्वाधिक पसंतीच्या पदार्थामध्ये अग्रस्थानी का येतो हे तो बनवताना पाहिल्यावर आणि खाल्लय़ावरच कळतं.

दिनेश गुप्ता यांचे आजोबा रामलोचन यांनी साठ वर्षांपूर्वी उल्हासनगरमध्ये चणे, शेंगदाण्याचं दुकान सुरू केलं. त्यानंतर त्यांचे वडील दीपचंद यांनी त्या व्यवसायाला भेलपुरी, पानीपुरी, शेवपुरीची जोड दिली. उल्हासनगरमध्ये सिंधी लोकांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे हे लक्षात घेऊन दिनेश यांनी आणखीन एक पाऊल पुढे टाकत ‘छोले-पॅटिस’ विकायला सुरुवात केली. उल्हासनगरवासीयांना इथल्या ‘छोले-पॅटिस’चा नाद लागल्यावर रमेश यांनी प्रयोगातूनच एक अनोखा पदार्थ तयार केला आणि त्याला नाव दिलं ‘हॉड डॉग’. या हॉड डॉगला ‘पॅटिस सँडविच’ असंही म्हटलं जातं. मुंबईत काही ठिकाणी ‘पाव पॅटिस’ हा प्रकार मिळतो. त्याच्याशी मिळताजुळता पण त्या सर्वाना पुरून उरेल असा असा हा ‘हॉड डॉग’ आहे.

‘पॅटिस सँडविच किंवा ‘हॉड डॉग’ अशी ऑर्डर दिल्यावर सर्वप्रथम पावाची जोडी घेतली जाते. मुंबईत मिळणाऱ्या वडापावच्या पावापेक्षा या पावांचा आकार थोडा मोठाच आहे. मधून आडव्या चिरलेल्या पावांना सर्वप्रथम तिखट आणि आंबट-गोड चटणी लावली जाते. त्यानंतर त्या पावामध्ये शेगडीच्या मंद आचेवर गरम होत असलेल्या छोलेच्या करीमधील छोले निवडून टाकले जातात. मग दुसऱ्या बाजूला मोठय़ा तव्यावर शेकणारा ‘दिल’च्या आकाराचा मोठा पॅटिस पावात भरला जातो. पॅटिस चण्याची दाल आणि बटाटय़ापासून तयार केलं जातं. चण्याची डाळ आणि बटाटा फक्त उकडून घेऊन त्यामध्ये वाटलेला घरगुती मसाला टाकून तळहाताएवढे दिलच्या आकाराचे पॅटिस बनवले जातात. पावात पॅटिस टाकल्यानंतर पाव तव्यावर ठेवून त्याला तेल टाकून दोन्ही बाजूंनी भाजून घेतलं जातं. मोठय़ा तव्यावरील तेलामध्येच थेट पावाची रवानगी होत असल्याचं बघूनच खरंतर कॉलेस्ट्रॉल वाढतं, पण पाव व्यवस्थित भाजल्याचं लक्षात येताच उलतण्याने पावावर जोर देऊन शक्य तितकं तेल पुन्हा बाहेर काढलं जातं. तव्यावरील या कृतीमुळे पावाच्या आतले छोले आणि पॅटिस दोन्ही पावांमध्ये सेट होऊन जातात. मग हे पाव एका प्लेटमध्ये घेऊन त्यावर छोलेची करी पसरवली जाते. हलकेच चटण्यांचा मारा केला जातो. पुन्हा एकदा करीतील छोले निवडून वर टाकले जातात आणि सर्वात  शेवटी बारीक चिरलेला कांदा टाकून ही भन्नाट डिश तुम्हाला सव्‍‌र्ह केली जाते.

‘हॉड डॉग’ या नावाने वेगळ्याच पद्धतीने तयार केलेला, पण तयार होताना उत्सुकता चाळवणारा हा पदार्थ मागवला खरा पण तो चवीला कसा लागेल याविषयी मनात शंका येते. पण पहिल्याच घासात ‘क्या बात’ अशी दाद देत तुम्ही ब्रेक न घेता ‘हॉड डॉग’ फस्त करता. पॅटिस आणि पाव तव्यावर भाजल्यामुळे मस्त कुरकुरीत झालेले असतात. छोलेची करी चवीला उत्तम आहेच पण छोलेही अगदी मऊ  शिजलेले असल्याने चावत बसावे लागत नाहीत. खरी मजा आहे ती आंबट-गोड चटणीची. ‘हॉड डॉग’च्या चवीला ती एक वेगळा आयाम देते. तुम्ही खात असताना दिनेश यांचं तुमच्या प्लेटकडे व्यवस्थित लक्ष असतं. प्लेटमधील करी संपलेय आणि पाव थोडा सुका दिसला की दिनेश स्वत:हून करी वाढतात. त्याचे वेगळे पैसे घेतले जात नाहीत हे महत्त्वाचं. केवळ पन्नास रुपयांमध्ये पोट टम्म करणारा हा पदार्थ मुंबईतही तुम्हाला कुठेच मिळणार नाही.

‘छोले पॅटिस’ आवडीने खाल्लं जातं. करीसोबत पावही छान लागतो. छोलेसाठी लागणारा मसाला वर्षांनुवर्षे घरीच तयार केला जात असल्याने ते एका विशिष्ट चवीचे लागतात. छोले घरूनच तयार करून आणले जातात आणि संध्याकाळी धंदा सुरू झाला की सर्व माल संपेपर्यंत शेगडीवरील मंद आचेवर शिजत असल्याने उत्तरोत्तर ते आणखीन चविष्ट होत जातात. ‘छोले पॅटिस’ आणि ‘हॉड डॉग’ या दोन प्रमुख पदार्थासोबतच पाणीपुरी, भेळपुरीही मिळते. मुंबईकरांसाठी खरंतर उल्हासनगर थोडं आडवाटेलाच आहे. पण कधी त्या भागात गेलात तर आवर्जून खाण्यासारखा हा पदार्थ आहे. जायच्या आधी दिनेश यांना फोन मात्र जरूर करा. कायम वेगळ्या पदार्थाच्या शोधात असणाऱ्या खवय्यांसाठी तर ही नक्कीच नवीन डिस्कवरी ठरेल.

राज पॅटिस आणि हॉड डॉग

  • कुठे ?- नेताजी बसस्टॉपजवळ, एचडीएफसी बँकेच्या शेजारी, नेताजी चौक, उल्हासनगर (पश्चिम) – ४२१००४
  • कधी ?- सोमवार ते रविवार संध्याकाळी ७:३० ते रात्री १०:३० वाजेपर्यंत
  • संपर्क – दिनेश गुप्ता ८९८३४४५५८४

@nprashant

nanawareprashant@gmail.com