अखिल भारतीय व्यंगचित्र संमेलन

सरकारविषयक एखादी गोष्ट पटत नसल्यास व्यंगचित्रकाराने व्यंगचित्रातून भाष्य करायलाच हवे. साहित्यिक, व्यंगचित्रकार, कलाकार समाजाची मशागत करत असतात. ही मशागत होणे गरजेचे असते, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलनात केले.

प्रत्येकालाच व्यंगचित्र काढता येणे शक्य नसते. मात्र व्यंगचित्रांची कला समाजात रुजवण्याची जबाबदारी प्रतिभावान व्यंगचित्रकारांनी घ्यायला हवी. सरकारच्या धोरणांविषयी काही गोष्टी पटत नसल्यास व्यंगचित्रकाराने चित्रातून भाष्य करायला हवे. स्पॅनिश व्यंगचित्रकार डेविड लोप्सच्या व्यंगचित्रांमध्ये सातत्याने सरकारविषयक धोरणांविषयी भाष्य केलेले असल्याने सरकारला त्याच्या व्यंगचित्रांविषयी दहशत असायची. महाराष्ट्रातही व्यंगचित्रकारांची परंपरा मोठी आहे. व्यंगचित्रकारांनी व्यंगचित्रातून कठोर भूमिका घ्यायला हवी, असे राज ठाकरे यांनी सांगितले. अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन आयोजित हास्यदर्शन सोहळ्यात विविध व्यंगचित्रांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पाच हजारहून अधिक व्यंगचित्र साकारणारे व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.