मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी ठाण्यात झालेल्या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना भाजप सरकारवर जोरदार टीका केली. याकूब मेमनसारख्या देशद्रोह्याच्या फाशीवर सरकारने केलेला तमाशा पाहून सरकारलाच आता देशात दंगली आणि भीषण गुन्हे झालेले हवेत का? अशी शंका उपस्थित झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. सत्ताबदल होऊनही बदल मात्र काहीही झालेला नाही. नुसते चेहरे बदलले मात्र राज्यासमोरील प्रश्न अजूनही कायम असल्याचे राज म्हणाले. मराठी तरुणांच्या प्रश्नांकडे, राज्याच्या विकासाकडे लक्ष देण्याऐवजी या सरकारकडूनही भ्रष्टाचाराचे पाढे सुरू झाले असल्याचे राज म्हणाले. आजही प्रशासनात अंतर्गत बदल्यांसाठी कोट्यावधींचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राज यांनी यावेळी केला. राज्याचे शिक्षणमंत्री विद्यार्थ्यांवरील भार कमी करण्याची गरज व्यक्त करतात आणि शाळेत जाऊन विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन करून पाहतात. पण विद्यार्थ्यांच्या दप्तराचे नाही तर विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक भाराचे ओझे कमी करण्याची गरज असल्याचे राज यांनी सांगितले. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी आधी विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ओझे कमी करावे. मुख्यमंत्री महत्त्वाकांक्षी आणि चांगला माणूस पण इतर मंत्री त्यांना काम करू देत नाहीत. तिकडे मोदी आणि अमित शहा फडणवीसांना बांधून ठेवतात, तर इथे खालची लोकं काम करू देत नाहीत, अशी टीका राज यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील राज यांनी निशाणा साधला. शरद पवार जातीचे राजकारण करीत असून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा जन्माला आता तेव्हापासूनच राज्याची अधोगती सुरू झाल्याचा घणाघात राज यांनी केला. याकूबच्या फाशीवर ट्विट करणाऱया सलमानला अक्कल काहीही अक्कल नाही. सलमानच्या हिट अँड रन सुनावणीनंतर सलमानला नव्हे, सलीम खान यांना भेटायला गेलो होतो, असेही राज यांनी यावेळी स्पष्ट केले. सलमानचे हिट अँड रन प्रकरणाची सुनावणी गेली १२ वर्षे चालली आहे. काय तपासणी चालू आहे एवढी १२ वर्षे? प्रलंबित खटले वर्षानुवर्षे सुटत नाहीत. इतर वेळी सुट्टयांची कारणे देऊन काम बंदी असणारी न्यायालयाने याकूबच्या सुनावणीसाठी मध्यरात्री कशी उघडतात? असे सवाल उपस्थित करून राज यांनी न्यायव्यवस्थेच्या भूमिकेवर देखील शंका उपस्थित केली.