राज ठाकरे यांच्या सभेच्या निमंत्रणाचे फलक परवानगीविना संपूर्ण ठाण्यात

एल्फिन्स्टन पूल चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रेल्वेस्थानकांबाहेर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या शनिवारी ठाण्यात जाहीर सभा घेणार आहेत. ‘कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ‘मनसे’ देणार’ असा संदेश देत राज यांच्या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करणारे फलक त्यानिमित्ताने ठाण्यात सर्वत्र झळकत आहेत. मात्र, यातील बहुतांश फलक अनधिकृतपणे लावण्यात आल्याचे उघड झाल्याने वेगळाच वाद निर्माण होऊ लागला आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने सार्वजनिक ठिकाणच्या फलकबाजीवर कडक निर्बंध आणले आहेत. मात्र, राज ठाकरे यांच्या सभेचे निमंत्रण देणाऱ्या फलकांच्या माध्यमातून मनसेने हे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून येत आहे. पाचपाखाडी, अल्मेडा रोड, नौपाडा, राम मारुती रोड, दिवा या भागांत लावण्यात आलेले बहुतांश फलक अनधिकृत असल्याचे सांगण्यात येत आहे. पथदिव्यांचे खांब, झाडे, मोकळय़ा भिंती अशा जागा मिळेल त्या ठिकाणी हे फलक लावण्यात आलेले आहेत. मात्र, पालिकेकडून अद्याप यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेने आक्रमक होत अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा हाती घेतला. ठाणे स्थानक परिसरात बेकायदा व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी पिटाळून लावले. त्यानंतर पालिका व पोलिसांनीही फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली. यामुळे ठाणेकरांमध्ये मनसेच्या पुढाकाराबाबत समाधान व्यक्त होत आहे. मात्र, अनधिकृत उद्योगांवर टीका करणाऱ्या पक्षानेच अशी अनधिकृत फलकबाजी आरंभल्याने काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, अनधिकृत फलक लावल्याचे आढळल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल व त्यासाठी संबंधित साहाय्यक आयुक्तांना सूचना देण्यात येतील, असे ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी स्पष्ट केले.