दहीहंडीसंदर्भात न्यायालयाच्या निर्णयावर जाहीरपणे टीका करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ( मनसे) अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा न्यायालयाला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. राज ठाकरे उद्या ठाण्यात जाऊन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गोविंदा पथकांची भेट घेणार आहेत. दहीहंडीच्या दिवशी जोशात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गोविंदा मंडळांचे पदाधिकारी गुन्हे दाखल झाल्यानंतर चांगलेच मवाळ झाले आहेत. साहेब काहीही करा पण आत टाकायच्या आधी फोन करा. घरी येऊ नका. एका फोनवर हजर होतो’ असे आर्जव करणारे दूरध्वनी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना येऊ लागले आहेत. त्यामुळे राज ठाकरेंची भेट या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना दिलासा देणारी ठरण्याची शक्यता आहे. मात्र, त्यामुळे आता पुन्हा याप्रकरणावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
ठाण्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश पायदळी तुडवत दहीहंडी उत्सव साजरा केल्याप्रकरणी ठाण्यातील मनसेच्या स्थानिक नेत्यांसह १६ गोविंदा मंडळांवर नौपाडा पोलिस ठाण्यात गुरूवारी सायंकाळी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये नऊ थर लावणाऱ्या जय जवान मंडळाचा समावेश आहे. मनसे वगळता ठाण्यातील अन्य आयोजक मात्र गोविंदा पथकांना चारपेक्षा जास्त थर लावू देत नव्हते. मनसेच्या ४० फुटी हंडीसाठी अकरा लाखांचे बक्षिस ठेवले होते. त्यामुळे आता पुन्हा याप्रकरणावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
अटक करायला घरी येऊ नका..
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधांमुळे दहीहंडीच्या सणात नेहमीसारखा उत्साह आढळला नसला तरी मनसेने मात्र रंग भरला होता. अन्य राजकीय पक्षांनी कारवाईच्या भीतीने सावधगिरी बाळगली असली तरी मनसेने उंच हंडय़ा आणि मनोरे रचण्यास संधी देऊन सण नेहमीसारखाच साजरा होईल यावर भर दिला होता. दहीहंडीच्या उत्सवात प्रथमच शिवसेनेपेक्षा मनसेचा बोलबाला झाला. सर्वोच्च न्यायालयाने २० फूट उंची आणि मनोरे उभारण्यावर मज्जाव केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली झाल्यास कारवाईच्या भीतीने शिवसेना, भाजप, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीशी संबंधित (काही अपवाद वगळता) मंडळांनी नियमांचे फार उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन करावे, असे आवाहन बहुतेक मंडळांच्या व्यासपीठांवरून केले जात होते. दहीहंडीच्या उत्सवात आतापर्यंत शिवसेनेचे वर्चस्व असायचे. यंदा प्रथमच मनसे पूर्ण तयारीनिशी या उत्सवात उतरली होती. मनसेशी संबंधित मंडळांमध्ये आठ ते नऊ थरांचे मनोरे रचण्यात आले होते.
हंडय़ांमध्ये मनसेचाच बोलबाला!
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 27, 2016 12:50 pm