कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का

ठाणे महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते संजय घाडीगावकर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या गटनेते पदावर ज्येष्ठ नगरसेवक राजन किणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापौरपदाच्या निवडणुकीत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला मदत केल्याचा तसेच विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडे उमेदवारी मागितल्याचा ठपका किणे यांच्यावर ठेवण्यात आला होता. महापौर निवडणुकीत शिवसेनेला अप्रत्यक्ष मदत केल्याचा ठपका ठेवत त्यांना काही काळ निलंबितही करण्यात आले होते. असे असताना पक्षाने त्यांना थेट गटनेते पदाची बक्षिसी दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

वर्षभरापूर्वी ठाणे काँग्रेसच्या शहराध्यक्षपदावरून बाळकृष्ण पूर्णेकर यांना हटविण्यात आले. गेल्या वर्षभरापासून काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्षपद रिक्त होते. ठाणे महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाही शहराध्यक्ष पदावर नियुक्ती होत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर उमटत होता.

या पाश्र्वभूमीवर ठाणे शहराध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर पालिकेतील काँग्रेसचे गटनेते संजय घाडीगावकर यांनी वैयक्तिक कारण पुढे करत गटनेते पदासह नगरसेवकपदाचा राजीनामा आयुक्तांकडे दिला. यामुळे काँग्रेस पक्षात उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे घाडीगावकर यांचे नगरसेवकपद मध्यंतरी रद्द करण्यात आले होते.