12 August 2020

News Flash

जिल्ह्य़ातील पाच करोना चाचणी केंद्रांची घोषणा हवेतच

१२ दिवसांनंतरही चाचण्यांसाठी अंबरनाथ, बदलापूरची मुंबईवरच मदार

राजेश टोपे (संग्रहित)

१२ दिवसांनंतरही चाचण्यांसाठी अंबरनाथ, बदलापूरची मुंबईवरच मदार

बदलापूर : करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने ठाणे जिल्ह्य़ात तातडीने पाच करोना चाचणी केंद्र सुरू केली जातील ही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा अद्याप कागदावर असल्याने चाचणी अहवालासाठी अजूनही बहुतांश शहरांची मदार मुंबईवरच असल्याचे चित्र आहे.

करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २ जुलै रोजी बदलापूर शहराचा दौरा केला. या वेळी त्यांनी अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमध्ये सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. त्या वेळी त्यांनी जिल्ह्य़ात चाचण्या वाढवण्यासाठी १० दिवसांत ५ चाचणी केंद्र सुरू करण्याची घोषणा केली होती. या घोषणेला १२ दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप एकही नवे चाचणी केंद्र उभे करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलेले नाही. त्यामुळे चाचण्यांसाठी लागणारा वेळ तितकाच असून चाचण्यांसाठी मुंबई आणि उपनगरातील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते आहे. करोनाच्या संसर्गाचे प्रमाण ठाणे जिल्ह्य़ातील शहरांमध्ये वाढत असताना अंबरनाथ, बदलापूरसारख्या शहरांमध्ये चाचणीचा अहवाल येण्यास वेळ लागत असल्याने अनेक रुग्णांचे उपचाराअभावी हाल सुरू आहेत.

करोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणीही वेळेत होत नसल्याने संशयितांमध्ये लक्षणे वाढून ते अत्यवस्थ होत असल्याचीही बाब गेल्या काही दिवसांमध्ये समोर आली होती. आरोग्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्य़ातील अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर आणि ग्रामीण भागासाठी प्रत्येकी एक अशा पाच चाचणी केंद्रांची उभारणी १० दिवसांत करण्याचे आदेश ठाण्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले होते. मात्र ही घोषणा हवेतच विरल्याचे दिसून येत आहे. अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील रुग्णांचे चाचणी नमुने मुंबईतील जेजे रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात येतात. अनेकदा या चाचण्यांचे अहवाल येण्यासाठी वेळ लागतो. त्यासाठीच या भागात चाचणी केंद्र सुरू करण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले होते. यासंबंधी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही. याविषयी जिल्हा आरोग्य यंत्रणेतील अधिकारीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत.

ग्रामीण रुग्णालयाला सूचना नाहीत

बदलापूर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात करोना चाचणी केंद्र उभारले जाईल, अशा चर्चाना उधाण आले आहे. मात्र ग्रामीण रुग्णालयाला याबाबत कोणत्याही सूचना आल्या नसल्याची माहिती येथील प्रशासनाने दिली. दरम्यान, शहरातील काही भाजप नगरसेवकांनी केंद्र सुरू होणार असल्याचे संदेश प्रसारित करून श्रेयवादाला सुरुवात केली आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 2:10 am

Web Title: rajesh tope announcement of five covid 19 test centers in the thane district still on paper zws 70
Next Stories
1 सार्वजनिक गणेशोत्सवही आता दीड दिवसाचा
2 शास्त्रीनगर रुग्णालयासमोर तडफडून रुग्णाचा मृत्यू
3 कल्याणमध्ये ‘धारावी पॅटर्न’
Just Now!
X