राखी, कारवाई आणि मदतनिधी

वसई वाहतूक पोलिसांनी रविवारी रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांनी अडवले आणि राखी बांधली. मात्र त्यांना दंड न आकारता ती रक्कम केरळ पूरग्रस्तांसाठी मदत देण्यास सांगितले.

रविवारी वसईतील नाक्यावर पोलिसांनी  वाहन तपासणी सुरू केली. ज्यांनी हेल्मेट घातले नव्हते आणि वाहनांची कागदपत्रे नव्हती अशा वाहनचालकांना अडवले. पोलीस कारवाई करतील असे वाहनचालकांना वाटत होते, परंतु महिला पोलिसांनी या प्रत्येकांना राखी बांधण्यास सुरुवात केली. त्यांना दंड न आकारता स्वखुशीने केरळ पूरग्रस्तांना मदतनिधी देण्यास सांगण्यात आले.  अंबाडी रोड, पंचवटी, रेज ऑफिस, बाभोळा नाका  या पाच नाक्यांवर पोलिसांनी राखी विथ खाकी हा उपक्रम राबवला. यातून ७० हजार रुपये मिळाले. हा निधी केरळ पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी सांगितले.

दुरावलेल्या भावा-बहिणींचे रक्षाबंधन

कुटुंबापासून दुरावलेल्या व मुंबईतील वेगवेगळ्या अनाथ आश्रमात राहिलेल्या भावा-बहिणींना रविवारी रक्षाबंधनाचा सण साजरा करता आला. अवर चिल्ड्रेन या संस्थेने भाऊ-बहिणींची ही अनोख्या पद्धतीने भेट घडवून आणली. त्यामुळे अनेक वर्षे दुरावलेले भाऊ -बहीण एकत्र आले होते.

मुंबईच्या वेगवेगळ्या अनाथ आश्रमात लहान मुले आहेत. कोणाचे छत्र हरपलेले, कोणी गरिबीमुळे तर कुणाच्या पालकांना एखाद्या गुन्हय़ात शिक्षा झाल्याने ते इथे आलेले. अशा अनेक कारणांमुळे पोरकी झालेली मुले अनाथ आश्रमात  बालपण घालवत असतात. मात्र मुला-मुलींची अनाथ आश्रमे वेगळी असल्याने सख्ख्या भावा-बहिणींची ताटातूट झालेली असते. अवर चिल्ड्रेन इंडिया या संस्थेने वेगवेगळ्या अनाथ आश्रमातील भावा-बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी एकत्र आणण्याचा संकल्प केला.

त्यासाठी इतर संस्थांशी संपर्क साधून भावा-बहिणींना शोधण्यास सुरुवात केली. १६ संस्थांमधून  २६० भाऊ -बहिणींचा शोध घेण्यात आला आणि रविवारी दादरच्या बॉम्बे आंध्रा महासभेच्या सभागृहात या नात्याचा अनोखा सोहळा रंगला. या सोहळ्याची आठवण म्हणून प्रत्येक भाऊबहिणीला त्यांचे एकत्र छायाचित्र देण्यात आले, असे संस्थेच्या स्वयंसेविका सौम्या बॅनर्जी यांनी सांगितले.

मी भावाला शेवटचे कधी पाहिले ते आठवतही नव्हते. मला त्याची खूप आठवण यायची. आज जेव्हा तो भेटणार होता, तेव्हा त्याच्याशी खूप बोलायचे होते, खेळायचे होते. मात्र तो समोर आला आणि नि:शब्द होऊन मला रडूच आले, असे सायनच्या मानवसेवा संस्थेत राहणाऱ्या फातिमा अन्सारी हिने सांगितले.