महाअवयवदान अभियानानिमित्ताने जिल्हा शासकीय रुग्णालयातून महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील एनकेटी महाविद्यालय, बेडेकर महाविद्यालय, ज्ञानसाधना महाविद्यालयातील विद्यार्थी, सामाजिक संघटना, शासकीय अधिकारी आणि रुग्णालयातील परिचारिका, अधिकारी-कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालय-जांभळी नाका या परिसरातून अवयवदानाचे महत्त्व सांगणारे फलक घेऊन जागृती करण्याचा प्रयत्न या महारॅलीच्या माध्यमातून करण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, आमदार संजय केळकर यांनी या रॅलीची झेंडा दाखवून सुरुवात केली.

अवयवदानाच्या जागृतीसाठी १ सप्टेंबपर्यंत अवयवदान अभियान राबविण्यात येत असून त्यानिमित्ताने वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी या उपक्रमांतर्गत महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक केम्पी पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्रविभागात डॉ. देशमुख आणि समुपदेशक काळे यांच्याकडे अवयव नोंदणीबाबत माहिती दिली जात आहे. इच्छुक अवयवदात्यांना इच्छापत्र, नोंदणी अर्ज व डोनरकार्ड नोंदणी कार्यक्रमांतून उपलब्ध करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.  अवयव निकामी झालेल्या रुग्णांना आवश्यक असलेले अवयव मिळाल्यास त्याला पुनर्जीवन मिळू शकतो. अवयवदानासारखे पुण्य कुठलेच नाही, तरी गरजू रुग्णांना नवे जीवन देण्यासाठी जिल्हय़ातील जनतेने अवयवदानासाठी पुढे येऊन हे महाअवयवदान अभियान यशस्वी करावे, असे आवाहन पालकमंत्री शिंदे यांनी या वेळी केले.

अवयवदान कसे कराल?

एखाद्या व्यक्तीस मृत्यूनंतर आपल्या अवयवांचे दान करण्याची इच्छा असल्यास त्यांनी कायद्यानुसार संमतिपत्र भरणे आवश्यक आहे. संमतिपत्रावर एखाद्या जवळच्या सज्ञान नातेवाईकाची सही घेणेदेखील आवश्यक आहे. असा फॉर्म भरल्यावर त्या व्यक्तीस डोनर कार्ड दिले जाईल. हे कार्ड दात्याने सतत आपल्या जवळ बाळगावे. जेणेकरून त्याच्या नातेवाईकाला अथवा मित्रपरिवाराला त्याच्या अवयवदान करण्याच्या इच्छेविषयी माहिती होईल. जरी आपण डोनर कार्डवर सही केली असली तरी आपल्या मृत्यूनंतर आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या संमतीशिवाय अवयव दान होऊ शकत नाही. म्हणून आपल्या इच्छेविषयी नातेवाईकांना माहिती असणे आवश्यक आहे. अवयवदानासाठी http://www.dmer.org किंवा http://www.ztccmumbai.org या वेबसाइटवर अवयवदानाचे कार्ड ऑनलाइन भरूनही नोंदणी करता येऊ शकेल. अधिक माहितीसाठी १८००२७४७४४४ / १८००११४७७० या क्रमांकावर संपर्क साधावा.