राम गणेश गडकरी पुतळाप्रकरण

पुण्याच्या संभाजी उद्यानातील भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांचा पुतळा उखडून टाकण्याच्या घटनेचे पडसाद साहित्य संमेलनात शनिवारी काही प्रमाणात उमटले. मात्र, आज, रविवारी संमेलनाच्या समारोप सोहळ्यात, खुल्या अधिवेशनात या घटनेचा निषेध करणारा निसंदिग्ध ठराव येतो का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

साहित्य संमेलन सुरू होण्याआधी काही पातळ्यांवर पुतळाप्रकरणी निषेधाचे सूर उमटले होते. शुक्रवारी संमेलन उद्घाटनात संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे यांनी याबाबत काहीच टिप्पणी न केल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. मात्र, समारोपात ते याबाबत काही भाष्य करतील, अशीही अपेक्षा आहे. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या काही परिसंवादांत या विषयाला काही वक्त्यांनी हलका स्पर्श केला. ‘संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे यांच्या भाषणावरील चच्रेत हा विषय काळे यांच्या समक्षच उपस्थित झाला व अध्यक्षीय भाषणात त्याबाबत काही भूमिका मांडली जाईल, अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली’, अशी भावना वक्त्यांनी नोंदवली. आज, रविवारी समारोप सोहळ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या खुल्या अधिवेशनात विविध विषयांवर ठराव मांडले जातील. त्यात पुतळाप्रकरणी निषेधाचा ठोस ठराव मांडला जातो का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दुपारी महामंडळाच्या विषय नियामक समितीची बठक होईल. या बठकीत ठराव खुल्या अधिवेशनात मांडायचे की नाही, यावर निर्णय होत असतो. त्यामुळे ठराव मांडण्यास या बठकीत मंजुरी मिळाल्यास तो लगेचच खुल्या अधिवेशनात मांडला जाऊ शकेल.

महामंडळाकडे अद्याप ठराव नाही

दरम्यान, ‘गडकरी पुतळाप्रकरणी कुठल्याही प्रकारचा ठराव शनिवार संध्याकाळपर्यंत तरी साहित्य महामंडळाकडे आलेला नाही’, असे महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

या रे या, पुस्तकखरेदी करा..

महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी.. सुशिक्षितांचे शहर.. लेखक-वाचकांचे गाव अशा बिरुदांचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनास अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने प्रकाशकांमध्ये चिंता असून, आज, रविवारी समारोपाच्या दिवशी तरी साहित्यप्रेमींनी ग्रंथ प्रदर्शनात उपस्थित राहून ग्रंथखरेदी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

उद्धव ठाकरे आज येणार की नाही?

शुक्रवारी संमेलनाच्या रा. चिं. ढेरे ग्रंथग्रामचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते होणार होते, मात्र त्यांनी त्याकडे पाठ फिरवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे संमेलन उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित होते, मात्र तेही आले नाहीत. आज, समारोप सोहळ्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, असे नियोजित कार्यक्रमानुसार ठरलेले आहे. मात्र महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीमुळे उद्धव ठाकरे समारोपास उपस्थित राहतील की नाही, याबाबत शंका आहे, अशी चर्चा शनिवारी रंगली होती.