तिसाव्या वर्षांत पदार्पण

ठाणेकरांची व्याख्यानमाला अशी ख्याती मिळवलेली रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला यंदा ३०व्या वर्षांत पदार्पण करत आहे. या व्याख्यानमालेची सुरुवात ९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता ठाण्यातील मल्हार चौकातील सरस्वती सेकंडरी स्कूल शाळेच्या पटांगणात होणार आहे. वर्षभरामधील चर्चेचा विषय ठरलेल्या विषयांचा परामर्श घेणाऱ्या या व्याख्यानमालेच्या निमित्ताने यंदाही नवे विषय ठाणेकर रसिकांना अनुभवता येणार आहेत. यामध्ये ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाच्या निमित्ताने लोकांसमोर आलेल्या बाजीरावांच्या शौर्याचा वेध तर बारीपाडा या गावाची स्वयंपूर्ण होण्याची कथाही उलगडण्यात येणार आहे.

पहिल्या दिवशी मराठी चित्रपट अभिनेता स्वप्निल जोशी आणि त्याच्यासह ‘फ्रेण्ड्स’ चित्रपटामध्ये सहकलाकार असलेले सतेज पाटील, गौरी नलावडे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याशी संवाद साधत व्याख्यानमालेचा शुभारंभ होणार आहे.  दुसऱ्या दिवशी १० जानेवारी रोजी दुबईस्थित उद्योजक धनंजय दातार यांची सुधीर गाडगीळ हे  मुलाखत घेणार आहेत. ११ जानेवारी रोजी ग्रामसुधारक चैताराम पवार उपस्थित राहणार आहेत. ‘स्वयंपूर्ण बारीपाडय़ाची गोष्ट’ या माध्यमातून ते आपल्या कामाची ओळख रसिकांना करून देणार आहेत. तर स्मार्ट आरोग्य या विषयावर मंगळवार, १२ रोजी डॉ. उल्हास कोल्हटकर मार्गदर्शन करणार आहेत.

बुधवार, १३ जानेवारी ‘अजिंक्य योद्धा बाजीराव’ या विषयावर ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांचे व्याख्यान होणार आहेत. १४ जानेवारी रोजी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे ‘असहिष्णुतेची वावटळ, भ्रम आणि वास्तव’ यावर भाषण देणार असून  समारोपाच्या दिवशी म्हणजे १५ जानेवारी रोजी सिने, नाटय़अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी आणि शीतल क्षीरसागर ‘आम्ही दोघी’ या विषयावर दिलखुलास गप्पा मारणार आहेत. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला समितीच्या या व्याख्यानमालेत गेल्या २९ वर्षांमध्ये विविध विषयावरील २०३ मान्यवर येऊन गेल्याचे व्याख्यानमालेचे संस्थापक अध्यक्ष, आमदार संजय केळकर यांनी सांगितले. रसिकांसाठी ही व्याख्यानमाला विनामूल्य असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.