26 February 2021

News Flash

समाजमाध्यमांवर नृत्यांगनेच्या रांगोळीचा गाजावाजा

ही रांगोळी नायगावजवळील जुचंद्र गावातील मनोज पाटील (३७) या कलावंताने काढली आहे.

अवघ्या बारा तासांत साकारली अप्रतिम रांगोळी

गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक या समाजमाध्यमांवर एका नृत्यांगनेच्या रांगोळीचा चांगलाचा गाजावाजा होत आहे. ही रांगोळी आहे की तिचे हुबेहूब छायाचित्र आहे, याबाबत शंका जरी घेतली जात असली तरी ही रांगोळी नायगावच्या जुचंद्र येथील मनोज पाटील या कलावंताने प्रत्यक्षात सलग १२ तासांत साकारली आहे, अशी माहिती मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून भरतनाटय़म्च्या पेहरावात असलेल्या एका तरुणीचे रांगोळी-चित्र समाजमाध्यमांवर गाजतेय. ही रांगोळी नायगावजवळील जुचंद्र गावातील मनोज पाटील (३७) या कलावंताने काढली आहे. मनोज गेल्या अनेक वर्षांपासून हौशी रांगोळीकार म्हणून प्रसिद्ध आहे. ऋतुजा नाईक या तरुणीने नुकतीच भरतनाटय़विशारद पदवी मिळवली. त्यानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन ठाण्यात करण्यात आले होते. त्या वेळी मनोजने तिची रांगोळी साकारली. रात्री ११ वाजता त्याने या रांगोळीसाठी सुरुवात केली ती सकाळी ८ वाजता पूर्ण झाली. एवढी हुबेहूब रांगोळी पाहून सारेच आश्चर्यचकित झाले होते. ही केवळ एका व्यक्तीची रांगोळी नव्हती. तिचा पेहराव, आभूषणे, चेहऱ्यावरील भाव हे सारे रांगोळीच्या रंगात उतरवायचे होते. त्यामुळे ही रांगोळी वेगळी ठरली असे मनोजने सांगितले.

एक आवड म्हणून मनोज रांगोळी काढत असतो. यापूर्वी त्याने काढलेल्या बाळासाहेब ठाकरे, साईबाबा,  अब्दुल कलाम,  राजेश खन्ना, बालयोगी सदानंद महाराज यांच्या हुबेहूब रांगोळ्यांनी प्रशंसा मिळवली होती. वसईच्या कला-क्रीडा महोत्सवातील रांगोळी स्पर्धेत मनोज यांना नेहमी प्रथम पुरस्कार मिळतो. सध्या ते इतरांना रांगोळी शिकवत असतात. त्यांनी रांगोळी शिकविलेली मुलेदेखील या कलेत पारंगत झाल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 1:11 am

Web Title: rangoli picture of a young girl getting viral on social media
Next Stories
1 अल्पवयीन मुलावर  लैंगिक अत्याचार
2 रेल्वे स्थानके फेरीवालेमुक्त!
3 दहा वर्षांनी माय-लेकींची भेट..
Just Now!
X