News Flash

टाळेबंदीत वसई ग्रामीण भागातील रानमेवा रानातच..

बाजार उपलब्ध नसल्याने आदिवासी बांधवांच्या हंगामी रोजगारावर गदा

(संग्रहित छायाचित्र)

बाजार उपलब्ध नसल्याने आदिवासी बांधवांच्या हंगामी रोजगारावर गदा

वसई : उन्हाळ्याच्या दिवसांत वसईच्या ग्रामीण भागातील रानात मिळणाऱ्या रानमेव्याला मोठी मागणी असते. टाळेबंदीमुळे रानातील रानमेवा बाजारात येऊ न शकल्याने आदिवासी बांधवांच्या हंगामी  रोजगारावर गदा आली आहे.

वसईच्या ग्रामीण भागातील रानमेवा हा प्रसिद्ध आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच रानात विविध प्रकारचा रानमेवा तयार होत असतो. यामध्ये करवंदे, जांभळे, चिंचा, कोसम, रांजणे, भोकरे, धामणे, तोरणे,  यांचा समावेश आहे. खेडय़ापाडय़ांतील आदिवासी बांधव हा रानमेवा गोळा करून बाजारात विक्रीसाठी घेऊन जातात. मार्च, एप्रिल, मे हे तीन महिने रानमेवा विक्रीसाठी महत्त्वाचे असतात. यातूनच या बांधवांना चांगले उत्पन्न मिळते. परंतु करोनाच्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे या मिळणाऱ्या हंगामी रोजगारावर पाणी सोडावे लागल्याचे या बांधवांनी सांगितले.

रानमेव्याच्या टोपल्या घेऊन या महिला शहरी भागात, रस्त्याच्या कडेला व दारोदारी फिरून विक्री करतात. यातून दिवसाला साधारणपणे ३०० ते ४०० रुपये मिळतात. याच पैशांतून घरी जाताना पावसाळ्यासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करायची असा त्यांचा क्रम असतो. परंतु मागील दीड-दोन महिन्यांपासून सर्व काही ठप्प असल्याने या बांधवांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

आर्थिक गणित कोलमडले

उन्हाळ्यात मुलांना शाळेला सुट्टय़ा असतात. त्यामुळे हे बांधव आपल्या सर्व कुटुंबासोबत रानात मिळणारी विविध प्रकारची फळे गोळा करून बाजारात विक्रीसाठी घेऊन जातात. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मुलांना लागणारे शैक्षणिक साहित्य, कपडे व पावसाळ्यात लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली जाते. दरम्यान, या वर्षी हातची कमाई गेल्याने सर्व आर्थिक बाजू कोलमडून गेली आहे. या साऱ्या वस्तू आता कशा खरेदी करायच्या, असाही प्रश्न या बांधवांना सतावू लागला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 2:06 am

Web Title: ranmeva in vasai rural areas not come to the market due to lockdown zws 70
Next Stories
1 यंदा गणेशोत्सवात श्रींच्या मूर्तीची कमतरता
2 ठाण्यातील खासगी करोना रुग्णालयांत शहराबाहेरच्यांना प्रवेशबंदी!
3 ठाणे जिल्ह्य़ात १७१ नवे रुग्ण
Just Now!
X