माहिती अधिकाराचा दुरुपयोग करून खंडणीची मागणी

वसईतील बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी उकळणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी तुळिंज पोलीस ठाण्यात शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे, भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष अरुण सिंग यांच्यासह तिघांवर बांधकाम व्यावसायिकाकडून १० लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. या विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी आतापर्यंत १६ गुन्हे दाखल केले आहेत.

विरार येथील बांधकाम व्यावसायिक निशाद चोरघे (४०) यांची मे. मनिगोविंद डेव्हलपर्स नावाची भागीदारीतील कंपनी आहे. या कंपनीमार्फत विरारच्या भूमापन क्रमांक ३०३, हिस्सा क्रमांक १-३ या ठिकाणी गोविंद हाइट्स नावाच्या इमारतीचे काम सुरू होते. चोरघे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २०१५ मध्ये भाजपा युवा मोर्चाचा अध्यक्ष अरुण सिंग याने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागवून इमारत अनधिकृत असल्याचे सांगितले. जानेवारी २०१५ मध्ये नगरसेवक धनंजय गावडे यांनी फिर्यादी चोरघे यांना भेटायला बोलावले आणि अरुण सिंग हा माझा साथीदार असल्याचे सांगितले. इमारत वाचवायची असेल तर ५० लाख द्यावे लागतील, असे सांगितले. यामुळे चोरघे यांनी दहा लाख रुपयांची खंडणी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार तुळिंज पोलिसांनी गावडे, अरुण सिंग याच्यासह ज्या हॉटेलात रक्कम स्वीकारली, त्या हॉटेलचा व्यवस्थापक कल्पेश राठोड या तिघांवर भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३८४, ३८६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विशेष मोहिमेत पोलिसांनी दाखल केलेला हा १६ वा गुन्हा आहे, तर नगरसेवक धनंजय गावडे यांच्यावर हा सातवा गुन्हा आहे.