‘करोना से मत डरोना’ ओळींमधून नागरिकांना संदेश

ठाणे : करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारतर्फे शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागांमध्ये जगजागृती करण्यात येत असतानाच आता ठाणे आणि डोंबिवली शहरांतील तरुणांनीही या जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. करोनाविरोधात लढण्यासाठी नागरिकांना बळ मिळावे यासाठी या तरुणांनी मिळून एक रॅप गीत तयार केले असून या गाण्याच्या माध्यमातून नागरिकांना करोना रोखण्यासाठी विविध संदेश देण्यात आले आहेत. ‘करोना से मत डरोना’ असे या रॅप साँगचे बोल असून या रॅप साँगला समाजमाध्यमांवर नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सर्वत्र टाळेबंदी जाहीर केली आहे. असे असले तरीही अनेक जण या नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर पडताना पाहायला मिळत आहेत. बाहेर पडणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन शासनातर्फे वारंवार करण्यात येत असले तरी नागरिकांतर्फे या आवाहनाला हरताळ फासला जात आहे. त्यामुळे करोना पसरण्याचा धोका असून नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी ठाणे आणि डोंबिवली येथील काही तरुण पुढे सरसावले आहेत. सध्या तरुणांकडून मोठय़ा प्रमाणात रॅप साँगला पसंती दिली जाते. ही बाब लक्षात घेऊन या तरुणांनी ‘करोना से मत डरोना’ हे रॅप साँग तयार करण्याचा निर्णय घेतला. सध्या टाळेबंदी असल्याने या तरुणांच्या चमूने या रॅप साँगचे घरातून चित्रीकरण केले आहे.

यज्ञेश दौंड या तरुणाने हे रॅप साँग लिहिले असून मंदार पाटील याने हे गाणे संगीतबद्ध केले आहे. सुमित साळुंके यांनी हे रॅप गायले असून पार्थ बारगोडे यांनी या रॅपमध्ये कलाकार म्हणून काम केले आहे. या संपूर्ण रॅपचे संकलन विनायक तळवडेकर या तरुणाने केले आहे. या रॅपच्या चित्रीकरणासाठी प्रत्येकाच्या कुटुंबाने मदत केली असल्याचे या तरुणांमधील यज्ञेश यांनी सांगितले.

नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

नागरिकांनी करोना विषाणूला घाबरु नये, सरकारच्या नियमांचे पालन करा, सामाजिक अंतर राखा, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करा, असा संदेश या रॅपमधून देण्याचा प्रयत्न या तरुणांनी केला आहे. हे रॅप चार दिवसांत तयार करण्यात आले असून काही दिवसांपूर्वी त्याची चित्रफीत यूटय़ूब वाहिनीवर प्रसारित करण्यात आली आहे. या रॅप साँगला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत हजारो नागरिकांनी ही चित्रफीत पाहिली असल्याचे या समूहातील यज्ञेश याने सांगितले.