कल्याण पूर्वेतील रेल्वे यार्डात एका मालगाडीवर (ब्रेक व्हॅन) कार्यरत असलेल्या २२ वर्षीय महिला गार्डचा दोन अज्ञात व्यक्तींनी विनयभंग केला. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रेल्वे हद्दीत घडल्याने लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

मालवाहू मालगाडय़ा कल्याण पूर्वेतील रेल्वे यार्डात सिग्नल व पूर्वसूचना मिळेपर्यंत उभ्या असतात. शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता एक मालवाहू गाडी यार्डात उभी होती. या गाडीच्या ब्रेक व्हॅनमध्ये महिला गार्ड  सिग्नलच्या प्रतीक्षेत एकटीच बसली होती. अचानक दोन अज्ञात व्यक्ती जबरदस्तीने ब्रेक व्हॅनमध्ये चढले. त्यांनी महिला गार्डचा विनयभंग केला. हा परिसर संध्याकाळी सातनंतर निर्मनुष्य असल्याने अंधाराचा फायदा घेत दोघांनी तेथून पळ काढला. अशी माहिती पोलिसांनी दिली.  रात्रीच्या वेळेत निर्जन स्थळी थांबणाऱ्या मालगाडीतील महिला गार्डच्या सुरक्षेसाठी कोणतीही यंत्रणा का नसावी, असा प्रश्न एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याने खासगीत उपस्थित केला आहे.