ठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा उपक्रम; गोरखचिंचेच्या झाडांचे जतन करणार

मानवी अतिक्रमणामुळे जंगलातील दुर्मीळ वनसंपदा नामशेष झाली आहे. या परिस्थितीत ठाण्यातील बहुगुणी वनस्पतींचे संवर्धनातून करून जतन करण्याचा प्रयोग ठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटी करणार आहे. या प्रयत्नामुळे मौलिक झाडांच्या जाती कायमस्वरुपी टिकणार आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ बाओबाबच्या (गोरखचिंच) दुर्मीळ झाडापासून करणार असल्याची माहिती  ठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे कौस्तुभ दरवेस यांनी लोकसत्ताला दिली.

ठाणे शहराला वनसंपदेचा मोठा वारसा लाभला आहे. येऊर, मानपाडा, मामा-भाचे डोंगर यासारख्या डोंगराळ आणि दाट झाडीच्या परिसरात हवामानानुसार वेगवेगळ्या वनस्पती आढळतात. काही झाडे आणि वेली औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहेत.  अलीकडे जंगलात मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे नैसर्गिक वनसंपदा धोक्यात आली आहे. पूर्वी ठाणे जिल्ह्य़ातील विविध भागामध्ये बाओबा, शमी, कांचन आदी सारखे वनस्पती मोठय़ा प्रमाणात सापडत. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे आता मोजक्याच दुर्मीळ वनस्पती शिल्लक असल्याचे दरवेस यांचे म्हणणे आहे. या वनस्पतींचे जतन करण्यासाठी ठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने  पुढाकार घेतला आहे.

पारंपरिक वृक्षलागवड पद्धतीचा वापर करुन दुर्मीळ वनस्पतींचे जतन व संवर्धन करण्याची त्यांची योजना आहे. या उपक्रमामध्ये काटेसावर, बिट्टी, जंगली भेंडी, पळस, करंज, उंडल, शमी, कांचन अशा दुर्मीळ वृक्षांची  लागवड, संर्वधन आणि जतन केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात गोरखचिंचेची लागवड आणि जतन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. २०११ च्या वृक्षगणनेनुसार ठाण्यात सध्या ४०-४२  इतकेच गोरखचिंचेचे वृक्ष असून येत्या काही वर्षांमध्ये हे झाड ठाण्यातून नामशेष होईल, अशी भीती पर्यावरण तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. अशा सुंदर आणि बहुगुणी महावृक्षाचे संवर्धन व्हावे यासाठी ठाणे नॅचरल हिस्टरी सोसायटीतर्फे गोरखचिंचेच्या बियांपासून नवी रोपे तयार करून त्यांची लागवड आणि संवर्धन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, असे दरवेस यांनी सांगितले.

आफ्रिकन पाहुणी

  • आफ्रिका खंडातील मादागास्कर बेटावरून आलेल्या या गोरखचिंच महावृक्षाने भारतीयत्व अंगीकारले.
  • या झाडाचा कोवळा पाला अनेक पशुपक्ष्यांचे खाद्य असून गोराखचिंच ‘क’ जीवनसत्त्वाचा मोठा स्त्रोत आहे. साधारणत: एक हजार वर्ष एवढे आयुष्य असलेले हे महावृक्ष ठाण्यात सध्या दुर्मीळ आहेत.
  • ठाणे शहर वसतानाच्या काळात चरई परिसरातील पाच पुरुषांच्या कवेत मावणार इतका मोठा बुंधा असलेल्या गोरखचिंचेच्या झाडावर निर्घृणपणे कुऱ्हाड चालविण्यात आली होती.