शब्दांपेक्षा छायाचित्रांची, चित्रांची भाषा अधिक प्रभावी असते. निसर्गभ्रमंती करणारे छायाचित्रकार वनस्पती आणि वन्य जीवनातील अनेक दुर्लभ क्षण कॅमेरात बंदिस्त करतात. ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयात शिकणारा आदित्य सालेकर याने गेल्या वर्षभरात आपल्या कौशल्याने अनेक निसर्गचित्रे कॅमेराद्वारे टिपली. त्याच्या छायाचित्रांना काही महत्त्वाची पुरस्कारही मिळाले आहेत.
अलिकडेच सेंच्युरी आशिया आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय छायाचित्रण स्पर्धेत आदित्यच्या छायाचित्राला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. क्वचितच आढळणारे ओरिएन्टल द्वार्क किंगफिशर हे पक्षी जून महिन्यात घरटी बांधण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच येऊरच्या जंगलात येतात. या पक्ष्यांपैकी नर पक्षी मादीने त्यांच्यासोबत रहावे म्हणून एखादे भक्ष्य तिला भरवतात. हे भक्ष्य मादीने खाल्ले तरच नर पक्ष्यासोबत घरटय़ात राहण्यासाठी ती तयार होते, असे मानले जाते. सामान्यांच्या नजरेत क्वचित दिसणारा हा क्षण आदित्यने आपल्या कॅमेऱ्यात अचूक टिपल्यामुळे राज्यस्तरावर आदित्यच्या या छायाचित्राचे कौतुक केले गेले. वेस्टर्न रुट्स या वन्यजीव विषयक मासिकातर्फे मुंबई स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र कॅलिओडोस्कोप २०१५ स्पर्धेत त्याला प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले. याशिवाय फोटो सर्कल सोसायटीतर्फे आयोजित ठाणे महापौर चषक छायाचित्र स्पर्धा, निसर्गमित्र, यात्रा टाइम्स फोटो स्पर्धा आदी स्पर्धामध्ये आदित्यने पारितोषिके पटकावली आहेत. आदित्यला लहानपणी उन्हाळ्याच्या सुटीत येऊरच्या जंगलात पक्षी निरीक्षण करण्याचा तसेच जंगलातील प्राण्यांच्या हालचाली टिपण्याचा छंद जडला. विविध प्राणी, पक्षी यासोबत निसर्गाचे सूक्ष्म चित्रण त्यान कॅमेऱ्यात टिपले आहे. जंगलात फिरताना मोठय़ा प्रमाणात पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास आदित्यच्या लक्षात आल्यावर येऊर पर्यावरण सोसायटी तसेच इतर संस्थांसोबत तो येऊर बचाव मोहिमेत कार्यरत आहे.