ऑनलाइन नोंद नसल्याने अडचणी

शिधावाटप केंद्रात बायोमॅट्रिक पद्धतीने धान्य देण्याची प्रक्रिया पुरवठा खात्याने सुरू केली आहे. मात्र यासाठी शिधापत्रिकाधारकांची ऑनलाइन नोंदणी न झाल्याने ते धान्यापासून वंचित राहत आहेत. यामुळे संतप्त महिलांनी तहसीलदार कार्यालयातच निषेध आंदोलन केले.

प्रशासनाने गोरगरिबांना रास्त भावात धान्य मिळावे यासाठी शिधावाटप केंद्रातून रेशनकार्डधारकांना धान्यवाटपाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र आता महाराष्ट्र शासनपुरवठा विभागामार्फत ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे. संगणकीकृत पद्धतीने रेशनकार्डधारकाचा अंगठा घेऊन धान्यवाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार शिधावाटप केंद्रात ऑनलाइन प्रणालीद्वारे पीओएस यंत्रणेच्या धान्यवाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र ज्यांच्या नावाची ऑनलाइन नोंदणी झाली नाही अशा रेशनकार्डधारकांना या धान्यापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे नालासोपारा येथील संतप्त नागरिकांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता.

या वेळी महापौर रुपेश जाधवदेखील उपस्थित होते. नागरिकांच्या गैरसोयीबद्दल चर्चा करून नागरिकांना वेळेत योग्य धान्य मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वसई तालुक्यातील अनेक भागांतील नागरिकांची शिधावाटप केंद्रातून धान्य मिळत नसल्याने अनेकांची गैरसोय होऊन त्यांना जास्त किंमत मोजून धान्य विकत घ्यावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. तसेच शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने नवीन शिधावाटप केंद्रदेखील सुरू करण्यात यावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. तसेच नागरिकांची धान्यपुरवठय़ामध्ये होणारी गैरसोय लक्षात घेता तात्काळ उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिले आहे.

नोंदणीचे काम सुरू

सध्या वसई तालुक्यात रास्त भाव धान्यपुरवठा विभागाची एकूण १७८ केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रात पुरवठा विभागात पीओएस यंत्रणेमार्फत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून धान्यवाटपाचे काम सुरू असल्याचे पुरवठा विभागामार्फत सांगण्यात आले आहे. प्रत्येक रेशनकार्डधारकाकडून आवश्यक असलेली कागदपत्रे घेऊन ऑनलाइन प्रक्रिया करण्यात आली आहे. ज्यांचे पीओएस यंत्रामध्ये नोंद झाली आहे, अशा रेशनकार्डधारकांना पीओएस यंत्राच्या साहाय्याने धारकाचा अंगठा घेऊन धान्य दिले जात आहे. जवळपास ९३ टक्के ऑनलाइन पद्धतीने रेशनकार्डधारकांची नोंदणी पूर्ण झाली आहे आणि जे बाकी आहेत त्यांचीदेखील नोंदणी करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.