ठाणे : करोनाकाळात लागू झालेल्या टाळेबंदीत नागरिकांपर्यंत नियमित अन्नधान्याचा पुरवठा करणाऱ्या शिधावाटप विभागातील कर्मचारी लसीकरणापासून वंचित असल्याने मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबई परिसरातील शेकडो शिधावाटप अधिकारी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना अजूनही शासनाने लसीकरणाची परवानगी दिलेली नाही. करोनाची दुसरी लाट सुरू झाल्याची भीती असताना त्या विभागातील अनेक कर्मचारी अजून लसीकरणापासून वंचित असल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.

राज्यात पुन्हा करोनाने डोके वर काढले असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होऊ लागली आहे. असे असतानाच आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस यांच्यासह आता ४५ ते ६० वर्षांपर्यंत सहव्याधी असलेले आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठीही करोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र करोनासारख्या या महासाथीच्या काळात नागरिकांपर्यंत अन्न पोहोचविण्याचे काम करणारे नियंत्रक शिधावाटप आणि संचालक नागरी पुरवठा यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच शिधावाटप दुकानचालक यांना अद्यापही शासनाकडून लसीकरणाची परवानगी देण्यात आलेली नाही. ठाणे आणि मुंबईमधील अन्न, नागरी पुरवठा विभागांतर्गत येणाऱ्या नियंत्रक शिधावाटप आणि संचालक नागरी पुरवठा कार्यालयात एकूण अकराशे अधिकारी तसेच कर्मचारी कार्यरत आहेत, तर ठाणे, मुंबईत एकूण ५ हजार ते ६ हजार शिधावाटप दुकानांच्या माध्यमातून नागरिकांना अन्नपुरवठा करण्यात येत आहे. करोनाकाळातही हे अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांपर्यंत अन्नधान्य पोहोचविण्याचे काम जबाबदारीने करत असले तरीही यांना लसीकरणापासून वंचित राहावे

लागत आहे, अशी खंत मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आरोग्यसेवक, सफाई कर्मचारी तसेच पोलीस यांच्यासह या करोनायोद्धय़ांनाही लसीकरणास परवानगी द्यावी, अशी मागणी या संघटनेने शासनाला केली आहे.

तीन वर्षांपासून पदे रिक्त

मुंबई, ठाण्यात शिधावाटप कार्यालयातील एकूण १ हजार ८९२ पदे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र, यापैकी गेल्या तीन वर्षांपासून ७९२ पदे अद्यापही रिक्त आहेत. ही पदे रिक्त असल्याने सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी तसेच कर्मचारी वर्गावर कामाचा भार पडत आहे. साहाय्यक नियंत्रक शिधावाटप, शिधावाटप अधिकारी, साहाय्यक शिधावाटप अधिकारी, शिधावाटप निरीक्षक आणि इतर कर्मचारी ही पदे रिक्त आहेत, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस विनायक निकम यांनी दिली.