रवींद्र प्रभुदेसाई : पीतांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक
जागतिकीकरणाच्या युगात अवलंबलेल्या मुक्त व्यापार धोरणामुळे वाढलेली स्पर्धा आणि उद्योग व्यवसायातील मंदी या दोन्ही आव्हानांना समर्थपणे तोंड देत ठाणेस्थित पीतांबरी प्रा. लि. ही दैनंदिन गरजेच्या वस्तू बनविणारी कंपनी दिवसेंदिवस यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करीत आहे. स्टीलच्या भांडय़ांचा वरचष्मा असलेल्या सध्याच्या काळात तांब्या-पितळेची भांडी घासण्यासाठी लागणारी पीतांबरी ही पावडर यशस्वीपणे विकणाऱ्या या कंपनीने अलीकडेच बाजारात आणलेली गोमूत्र प्लस ही औषधी कॅप्सूल्स सध्या बरीच लोकप्रिय आहे. लवकरच तयार मसालेही पीतांबरीतर्फे विक्रीस आणले जाणार आहेत. त्यानिमित्त या उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांच्याशी ‘लोकसत्ता ठाणे’ने संवाद साधला.   

’तांब्या-पितळेची भांडी आता सहसा कुणी वापरत नाहीत, असे म्हटले जात असताना ती स्वच्छ करणारी पावडर आपले पहिले उत्पादन म्हणून बाजारात आणणे ही जोखीम होती, असे वाटत नाही का?
अजिबात नाही. उलट आम्ही ते जाणीवपूर्वकच केले. कारण युग स्टीलच्या भांडय़ांचे असले तरी सर्वचजण स्वयंपाकघरात, न्हाणीघरात आणि देवघरात कमी-अधिक प्रमाणात तांब्या-पितळेची भांडी वापरतात. साध्या पावडरने घासून ती स्वच्छ होत नाहीत. पूर्वी आम्ही पंचतारांकित हॉटेल्सना तांबा-पितळेची भांडी घासण्यासाठी लागणारी कॉकशाइन नावाची पावडर पुरवीत होतो. त्यामुळे त्याची उपयुक्तता चांगलीच ठाऊक होती. त्याच पावडरमध्ये काही फेरबदल करून आम्ही पीतांबरी पावडर आणली.
’ पीतांबरीचा प्रवास कसा घडला?
कोणत्याही नव्या गोष्टीची सुरुवात शून्यातून होते. आम्हाला त्याची जाणीव होती. मात्र आमचा आमच्या उत्पादनावर विश्वास होता. सुरुवातीला आम्ही सेल्समन नेमून त्यांच्याकरवी घरोघरी हे नवे उत्पादन पोहोचविले. फ्री सॅम्पल्स वाटली. लोकांना ते उपयुक्त वाटू लागले. त्यानंतर त्याची मागणी वाढू लागली. मग दुकानदार मागू लागले. ‘बायको गेली माहेरी काम करी पीतांबरी’ असे सांगणारा अभिनेता प्रशांत दामले या उत्पादनाचा ब्रँड अँबेसेडर होता. मागणी वाढल्यावर मग आम्ही सेल्समनला एजन्ट म्हणून नेमले. सध्या भारतभर पीतांबरी विकली जाते. वर्षभरात सहा कोटी पीतांबरीची पाकिटे विकली जातात. सध्या पीतांबरी उद्योग समूहाची वार्षिक उलाढाल १२० कोटी असून त्यातील ६० टक्के हिस्सा एकटय़ा पीतांबरीचा आहे. बडोदा आणि हिमाचल प्रदेशातील बद्दी या ठिकाणी तिचे उत्पादन होते.
’स्पर्धा आणि मंदी या दोन आव्हानांना तोंड देत सध्या पीतांबरी उद्योग समूह प्रगती करताना दिसतोय. या यशाचे रहस्य काय?
ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारी नावीन्यपूर्ण उत्पादने पीतांबरीने सातत्याने बाजारात आणली. ती आणताना आम्ही बाजारात उपलब्ध असणाऱ्या स्पर्धक व्यावसायिकांचे अनुकरण कधीच केले नाही. उलट आम्ही कायम स्वत:शीच स्पर्धा करीत उत्पादनात सुधारणा करीत राहिलो. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढत गेला. पीतांबरीप्रमाणेच चांदीची भांडी घासण्यासाठी उपयुक्त अशी रुपेरी नावाची पावडर आम्ही बाजारात आणली. तीसुद्धा तितकीच लोकप्रिय झाली. कारण घरोघरी चांदीची भांडी आहेत. ती घासण्याचा प्रश्न या पावडरीने सोडविला. तांब्या-पितळेबरोबरच आम्ही स्टीलची भांडी चमकविणारा लिंबाच्या सुगंधांनी युक्त डिशवॉश बारही बाजारात आणला.
’ सध्या आपल्या गोमूत्र प्लस कॅप्सूलची खूप चर्चा आहे, काय आहे नेमके त्यात?
आयुर्वेदात गोमूत्राचे अनेक औषधी उपयोग सांगितले आहेत. ते मुख्यत: जंतुनाशक तसेच बुरशीनाशक आहे. अपचन, बद्धकोष्ठता, रक्तदाब, मधुमेहतसेच त्वचारोगावर ते गुणकारी आहे. आम्ही हरडा, बेहडा आणि आवळा या त्रिफळा चूर्णाच्या मिश्रणाने गोमूत्राची उपयुक्तता दहापटीने वाढवली. पुन्हा ही पावडर स्वरूपात कॅप्सूलमधून दिल्याने ती थेट पोटात जाते. दोन महिन्यांपूर्वीच बाजारात आलेल्या या कॅप्सूलला खूप मागणी आहे.
’ अशी नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणण्यापूर्वी आवश्यक सर्वेक्षण आणि संशोधनाची कोणती व्यवस्था आहे ?
पीतांबरी उद्योग समूहाचा रबाळे येथे स्वतंत्र संशोधन आणि विकास (आर अ‍ॅण्ड डी) विभाग आहे. तिथे निरनिराळ्या नव्या उत्पादनांबाबतचे संशोधन होते. त्यासाठी प्रशिक्षित तज्ज्ञ नेमण्यात आले आहेत. आयुर्वेदिक औषधांची उपयुक्तता पीतांबरीच्या दवाखान्यातच तपासली जाते.
’ पीतांबरीची अन्य लोकप्रिय उत्पादने कोणती?
ँआता पीतांबरीचा पसारा खूप वाढला आहे. २५ वर्षांपूर्वी केवळ एकच उत्पादन होते. आता कंपनीचे होमकेअर, हेल्थकेअर, अ‍ॅग्रो, पर्सनल केअर आणि फूडकेअर असे पाच विभाग आहेत. या पाचही विभागांतून एकूण ५० उत्पादने आम्ही बाजारात आणली आहेत. त्यात होमकेअर विभागात पीतांबरी, रुपेरी, पीतांबरी डिशवॉश बार व लिक्विडबरोबरच पीतांबरी मेटल पॉलिश, क्लेन्झ पॉवरवॉश आदी उत्पादने आहेत. हेल्थकेअर विभागात क्युअरऑन हे वेदनाशमक आयुर्वेदिक तेल, वसुंधरा बेबी मसाज ऑइल, पंचरस हा सुपारीविरहित पाचक मुखवास, के- नील हे पोटातील कृमींवर प्रभावी औषध आदींचा समावेश आहे. आता आलेली गोमूत्र प्लस ही बहुगणी कॅप्सूल याच विभागातील उत्पादन आहे. कृषी विभागात तिळाचे तेल (सप्तशती), अरिशक्ती (राइसब्रान तेल), शेंगदाणा तेल (भूशशक्ती) आदी उत्पादने आहेत. सौंदर्य विभागात चारू स्क्रीन ब्लिच, चारू फेशियल किट, चारू अलोव्हेरा जेल तर फूडकेअर विभागातर्फे आम्ही लवकरच रूचियाना गोडा मसाला, रूचियाना हळद पावडर आणि रूचियाना तिखट पावडर बाजारात आणत आहोत. आमची देवभक्ती नावाची अगरबत्ती खूप लोकप्रिय आहे. दापोली येथे आमच्या जागेत त्यासाठी आम्ही खास सोनचाफ्याच्या एक हजार झाडांची लागवड केली आहे. त्यापासून दररोज आम्हाला एक हजार फुले मिळतात. तो अस्सल अर्क आम्ही अगरबत्तीच्या सुगंधासाठी वापरतो.     
’  मध्यंतरी ‘पीतांबरी’ने स्टुडिओ सुरू केला. हे नेमके काय आहे?
 उत्पादनांबरोबरच गरजेप्रमाणे सेवा देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. जाहिरातीसाठी ठाण्यात अद्ययावत स्टुडिओ नाही, हे लक्षात आल्यावर आम्ही विष्णुनगरमध्ये चित्रीकरणासाठी लागणाऱ्या अद्ययावत सुविधांसह स्टुडिओ सुरू केला. माजिवडा येथे आमचे आयुर्तेज पंचकर्म केंद्र आहे. सीएसआर हा अगदी अलीकडचा शब्द झाला, आम्ही सामाजिक तसेच सांस्कृतिक बांधीलकी मानून नफ्यातील विशिष्ट प्रमाण अशा उपक्रमांसाठी नेहमीच उपलब्ध करून देत असतो.    
’ ‘पीतांबरी’च्या भविष्यातील वाटचालीविषयी काय सांगता येईल?
आतापर्यंत एकाच कंपनीच्या छताखाली हे पाच विभाग कार्यरत आहे. लवकरच पीतांबरीच्या पाच उपकंपन्या होऊन प्रत्येक विभागातील उत्पादने त्या त्या कंपनीमार्फत बाजारात आणली जातील. सध्या पीतांबरी उद्योग समूहात हजारहून अधिक कर्मचारी-तंत्रज्ञ कार्यरत आहेत. येत्या पाच वर्षांत कंपनीची वार्षिक उलाढाल पाचशे कोटी रुपयांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे.
प्रशांत मोरे

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…