सेंच्युरी कंपनीजवळ नाल्यात रसायने सोडणारा टँकर ताब्यात; अंबरनाथमधील कंपनीच्या संचालकांवरही गुन्हा

उल्हासनगर : उल्हास आणि वालधुनी नदीच्या प्रदूषणासाठी नागरी सांडपाण्यापेक्षा औद्योगिक वसाहतीतील कंपन्या आणि औद्योगिक सांडपाणी अधिक जबाबदार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. शहाडजवळ सेंच्युरी कंपनीच्या सुरक्षा विभागाने कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सांडपाण्याच्या नाल्यात रसायने सोडणाऱ्या एका टँकरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तर अंबरनाथमध्ये बायेक्झरा कंपनीच्या संचालकांवर प्रक्रिया न करता सांडपाणी नाल्यात सोडल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे उद्योगांच्या बेजबाबदारपणावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

चार दिवसांपूर्वी वालधुनी नदीच्या पात्रात अज्ञात टँकरने रसायने सोडल्याने वालधुनी नदीकिनारच्या नागरिकांना तीव्र रासायनिक दर्पाचा सामना करावा लागला होता. त्यातच बुधवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी संजय भोसले यांच्या फिर्यादीवरून अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मे. बायेक्झरा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक सतीश नारायण गुंजीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया उभारली असतानाही प्रक्रिया न करता कंपनीच्या मागच्या बाजूस असलेल्या नाल्यात थेट सांडपाणी टाकल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

दुसरीकडे उल्हासनगरातील शहाडजवळ सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या साहित्य वाहतुकीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पालिकेच्या नाल्यात रसायने सोडणाऱ्या एका टँकरला कंपनीच्या सुरक्षा विभागाच्या रक्षकांनी ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. हा टँकर कंपनीच्या रहिवासी संकुलाबाहेर उभा होता. त्यापूर्वी कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेरच्या नाल्यातून उग्र वास येत असल्याने सुरक्षारक्षकांनी आसपास शोधाशोध केली होती. तेथे आढळलेल्या टँकरमधूनही सारखाच दुर्गंध येत असल्याने सुरक्षारक्षकांनी पोलिसांना पाचारण केले होते. टँकरच्या चालकाने येथून पळ काढला.

प्रदूषण नियंत्रण मंडळाची दिरंगाई

सेंच्युरी कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी पकडलेल्या रसायनांच्या टँकरबाबत उल्हासनगर पोलिसांना माहिती देण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दोन दिवसांपूर्वी लेखी स्वरूपात देण्यात आली. मात्र आजतागायत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने हालचाल झाली नसल्याचे समोर आले आहे. उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. बी. कदम यांना याबाबत विचारले असता, आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाला अहवाल दिला मात्र त्यांनी अद्याप प्रतिसाद दिला नाही, असे ते म्हणाले. टँकरमधील रसायन, त्याची तीव्रता याबाबत पोलिसांना माहिती देण्याची जबाबदारी त्यांची आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या दिरंगाईवर पर्यावरणप्रेमी संशय व्यक्त करत आहेत.