कल्याण रेल्वे स्थानक आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे स्थानक करणार या प्रशासनाच्या घोषणेला आता एक वर्ष पूर्ण होईल. रेल्वे स्थानकासमोरची दर्शनीय कमान आणि काही तिकिटाची यंत्रे याव्यतिरिक्त अजून तशी काही सुधारण्याची पावले पडली नाहीत. महाराष्ट्राच्या खेडय़ापाडय़ात सुधारण्याच्या प्रकाशाअगोदरच महाराष्ट्र परिवहन सेवेची बस पोहोचली. या बस सेवेनेही बदलाची कात टाकली. ‘गळकी एस. टी. दाखवा हजार रुपये कमवा’ अशी आकर्षक घोषणा झाली. गळकी एस.टी. गळकीच राहून, नफ्यात येत नाही म्हणून ‘हात दाखवा एस.टी. थांबवा ’ची घोषणा झाली. गोरीगोमटी एशियाड ही म्हातारी झाली म्हणून आकर्षक रंग आणि काही सुधारणांनी नटून एस. टी. धावू लागली. परंतु बस स्थानकातील प्रवाशांची आणि अन्य नागरिकांची मानसिकता मात्र बदलली नाही. कल्याण बस स्थानक परिसरही कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे. बस स्थानकातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डेही पाहायला मिळतात. या परिसरात मल-मूत्रविसर्जनासाठी असलेल्या काही टाक्यांना झाकणेही बसविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या टाक्यांमध्ये प्रवाशांचे पाय अडकून पडणे, कपडे खराब होणे अशा दुर्घटना घडताना दिसतात. याचा विनाकारण फटका प्रवाशांना बसतो. बस स्थानकात नवीन प्रसाधनगृह बांधण्यात आले आहे खरे, परंतु ते फक्त नावापुरतीच. कारण या प्रसाधनगृहातील दरुगधीमुळे येथे कुणीही चुकूनसुद्धा जाण्याची हिंमत करीत नाही. प्रसाधनगृहात जायचेच झाल्यास खड्डय़ातील साचलेले पाणी, परिसरातील सर्वत्र पसरलेला चिखल या सगळ्याचा सामना करावा लागतो. बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराला फेरीवाल्यांनी विळखा घातलेला आहे. फेरीवाल्यांच्या या विळख्यातून बसना आपली वाट काढावी लागते. बस स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला लागूनच गटार वाहताना दिसते. गटारीलगत फळविक्रेते मुक्तपणे फळे विकताना दिसतात.

कल्याण बस स्थानकातून वाशी, पनवेल, मुरबाड, शहापूर आदी ठिकाणी जाणाऱ्या बससाठी स्वतंत्र बस थांब्यांची व्यवस्था नाही. बस स्थानकाच्या या परिसरात मुबलक मोकळी जागा असून त्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. परिसरातील कचरा साफ करून या ठिकाणी बस थांबे उभारण्यात आले तर बस प्रवाशांची गैरसोय निश्चितच टळेल. शिवाय ऊन, पावसापासून प्रवाशांचे रक्षणही होईल. नुसत्या झकपक घोषणा करण्यापेक्षा आणि संगणक नटवून सुधारित तंत्रज्ञान आणण्यापेक्षा प्रवाशांच्या संबंधित समस्या प्रशासनाने सोडवल्या तर प्रवासी निश्चितच समाधानी
होतील. राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी संबंधित प्रश्नांची दखल घेणार का?

ठाणे शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात
महापालिका क्षेत्रात दररोज नवनवी गृहसंकुले, आय.टी. पार्क, मॉल आणि अन्य वास्तू उभ्या राहत असल्याने भविष्यात वाहतूक कोंडीची समस्या जटिल होण्याची चिन्हे आहेत. वाहतूक व्यवस्था अधिक गुंतागुंतीची होऊ नये म्हणून महापालिकेने आताच पावले उचलण्याची गरज आहे. ठाणे शहरातील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील महत्त्वाचे रस्ते अरुंद असल्याने या कोंडीत भर पडत आहे. या रस्त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव राहिलेला नाही. त्यामुळे ठाणे शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले आहे. वाहनांच्या संख्येत वाढ होत असल्याने ही समस्या बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने आता शहरातील वाहतुकीचे नियोजन करताना भविष्याचा विचार करून त्याप्रमाणे काही रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाण पूल आणि वाहनतळाची व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आणि सर्वच मार्गाचा सविस्तर शास्त्रीय अभ्यास करून त्या आधारे वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे आहे. रस्त्याच्या मधोमध अथवा रस्त्याच्या कडेला बस उभ्या करून सार्वजनिक परिवहन सेवेचे प्रवासी पळविणाऱ्या घोडबंदर मार्गावरील खासगी बसचालकांचा उद्धटपणा आता आणखीनच वाढला आहे. त्यांच्या या अरेरावीमुळे तीनहात नाका, नितीन, कॅडबरी आणि घोडबंदर मार्गावरील मानपाडा या भागात काही वेळेस वाहतूक कोंडी तर होत आहेच, शिवाय किरकोळ अपघातही घडू लागले आहेत. परंतु, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याऐवजी वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून त्यांना छुपा पाठिंबा दिला जात आहे. अशा विविध समस्यांच्या गर्तेत ठाणेकर रोवले जात आहेत.