दिवाळी अंकांच्या धर्तीवर वसईत नाताळ अंकांची परंपरा कायम

दरवर्षीप्रमाणे यंदाही वाचकांची साहित्यिक भूक भागवण्यासाठी दर्जेदार नाताळ अंक बाजारात आले असून सामाजिक भान जपणाऱ्या अनेक विषयांवरील साहित्य हे या अंकांचे वैशिष्टय़ आहे. ‘सुवार्ता’, ‘गीत’, ‘जनपरिवार’ या अंकाबरोबर ‘ख्रिस्तायण’ हा ऑनलाइन नाताळ अंक यंदाचे आकर्षण ठरले आहे.

१९५५ साली सुरू झालेल्या सुवार्ता मासिकाची वसईतील सामाजिक चळवळीत महत्त्वाची भूमिका आहे. ‘मी सामाजिक कार्यात कसे योगदान देतो?’ या विषयावर परिसंवाद या अंकात आहे. त्यात साहित्यिक पु. द. कोडोलीकर, सदानंद मोरे, शास्त्रज्ञ रंजन केळकर यांनी आपले विचार मांडले आहेत. संपादक फादर रेमंड परेरा यांचा विशेष लेख या अंकात आहे. फादर मॉन्सेनिअर फ्रान्सिस कोरिया यांची ‘चिंतनिका’, झेविअर डिमेलो, संदीप राऊत यांचे पुस्तक परीक्षण आणि जॉन घोन्साल्विस यांची लघुकथा या अंकात आहे.

अ‍ॅण्डय़ू कोलासो यांनी संपादित केलेल्या जनपरिवार या नाताळ अंकात अ‍ॅण्डय़ू जोसेफ डाबरे यांना गुजरातमधील अंकलेश्वर येथे कार्य करत असताना आलेला अनुभव, ‘अकबराचा सर्वधर्मसमभाव’ याबाबत लेख आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नव्याने उभारण्यात आलेल्या पुतळ्याच्या संदर्भात ‘पुतळे बोलू लागले..’ हा उपरोधिक पद्धतीचा लेख, अचला मच्याडो यांचा ‘पावले चालती.. अनुभूतीच्या           वाटेवरती’ हा लेख, जोसेफ तुस्कानो डॉ. लेस्ली घोन्सालवीस यांच्यावरील मृत्यूलेख आहेत. पत्रकार सतीश खांबेटे यांनी मॉस्कोत नाताळ आणि नववर्ष कसे साजरे केले जाते, एडवर्ड डिक्रूझ यांनी येशू ख्रिस्ताच्या जीवनावर लालित्यपूर्ण शैलीत लिहिलेल्या ‘शाश्वत’ कादंबरीचा अंतिम भाग आहे. फादर हिलरी फर्नाडिस यांच्या प्रवचन मालिका अंतर्गत ‘मैं कुछ भी नही हूँ’ असे वेगवेगळ्या विषयावरील लेख वाचकांना आनंद देणार आहेत.

‘गीत’ हा नाताळ अंक गेल्या सहा वर्षांपासून वाचकांच्या भेटीला येत आहे. या वर्षी अंकाचा विषय ‘गोजिरवाणे घर’ असा आहे. अंकामध्ये नाताळविषयी स्टिफन परेरा यांचा बाराई (नाताळमधील १२ दिवस), फादर अ‍ॅण्डय़ू डाबरे यांचा ‘माझ्या जीवनातील अविस्मरणीय नाताळ’ असे लेख वाचायला मिळणार आहेत. ‘वसई पुन्हा बुडू नये म्हणून..’, ‘अवनी वाघिणीची दहशत’ असे पर्यावरणविषयक लेख या अंकात असल्याची माहिती संपादक लेस्ली डायस यांनी दिली.

वसईतील पहिला ऑनलाइन नाताळ अंक असलेल्या ख्रिस्तायण अंकाचे आठवे वर्ष आहे. ख्रिस्ती समाजाची प्रशासकीय सेवेबद्दल असलेली उदासीनता या विषयावर परिसंवाद घेण्यात आला आहे. कथा-कवितांबरोबर अवयवदान, आंतरधर्मीय सुसंवाद तसेच सामाजिक विषयांवरील लेखांचा अंकात समावेश आहे.

वसई परिसरातील नवकवी-लेखकांच्या साहित्यकृतींनी तसेच प्रतिभावंत चित्रकारांच्या चित्रांचा आणि फा. फ्रान्सिस दिब्रिटो, सायमन मार्टिन, जोसेफ तुस्कानो, जॉन कोलासो, प्रा. नेहा सावंत, कवी वर्जेश सोलंकी, महेश लीलापंडित, इग्नेशियस डायस आणि फेलिक्स डिसोजा यांच्याही साहित्यकृतींचा अंकात समावेश आहे. christayan.in या संकेतस्थळावर हा अंक उपलब्ध आहे, असे संपादक ख्रिस्तोफर रिबेलो यांनी सांगितले.