चिन्मय मांडलेकर, अभिनेते
माझ्या वडिलांना वाचनाची जास्त आवड होती. घरात ऐतिहासिक कादंबऱ्या, पु.ल. देशपांडे यांचे साहित्य होते. त्यामुळे वाचनासाठी आवश्यक असलेले पूरक वातावरण माझ्या घरातच होते. त्यामुळे लहानपणापासून वाचनाची सवय लागली. चंपक, इंद्रजाल, फँटम, मॅनड्रेक यांसारखी कॉमिक्स लहान असताना खूप वाचली. दहावीच्या व्हेकेशन क्लासला ज्या दिवशी प्रवेश केला, त्याच दिवशी वडिलांनी ‘विश्वास पाटील’ यांची पानिपत कादंबरी हातात दिली. माझे शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले असल्याने ही कादंबरी वाचायला बराच वेळ लागेल असे वाटले होते. मात्र ही कादंबरी मी त्या वेळी दहा दिवसांत वाचून संपवली होती. इंग्रजी माध्यमातील शिक्षण असूनही मराठी वाचनाची सवय वडिलांमुळे लागली. त्यामुळे याबाबतीत मला वडिलांचे आभार मानावेसे वाटतात.
एकाच प्रकारचे साहित्य वाचायला मला आवडत नाही. सर्व तऱ्हेचे साहित्य मी वाचतो. कोणत्या वेळी काय वाचायचे हे त्या वेळच्या आवडीवर अवलंबून असते. मध्ये काही काळ मी विनोदी साहित्य खूप वाचले. पी. जी. वुडहाऊस हे माझे आवडते लेखक आहेत. पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार, शंकर पाटील, जी. ए. कुलकर्णी यांचे साहित्य वाचायला मला खूप आवडते. मोहन राकेश यांचे साहित्य वाचतो. वाचनातील साचेबद्धपणा न ठेवता वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचतो. मला रत्नाकर मतकरींच्या कथा वाचायला आवडतात. गॅब्रियल गार्सिया मार्केस, शेक्सपिअर यांचे साहित्य वाचताना वेगळय़ा वाचनसिद्धीचा आनंद मिळतो. माझ्या वैयक्तिक संग्रहात अडीच ते तीन हजार वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील पुस्तके आहेत. त्यात वेळोवेळी भर पडतच असते. आता तर पुस्तके ठेवायलाही घरात जागा नाही. तरीही घरात बरीच पुस्तके आहेत. वडिलांकडून माझ्याकडे आलेली अनेक पुस्तके त्यांची आठवण म्हणून माझ्या संग्रही आहेत.
tv17माझी वाचनाची आवड लक्षात घेऊन सासू-सासऱ्यांनी किंडल भेट म्हणून दिले. त्यामुळे खूप फायदा झाला आहे. मलासुद्धा माझ्या लाडक्या व्यक्तीला काही भेट द्यायची असल्यास आणि अर्थात त्या व्यक्तीला वाचनाची आवड असल्यास पुस्तक हा उत्तम पर्याय माझ्यासाठी असतो. माझ्याकडची पुस्तके मी देत नाही. मात्र हल्ली ऑनलाइन पुस्तके खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याने पुस्तके खरेदी करून ती भेट देतो. कोणतेही पुस्तक खरेदी केल्यावर ते पुस्तक कुठे खरेदी केले आणि त्या दिवसाची तारीख मी पुस्तकावर लिहून ठेवतो. त्यामुळे ती आठवण आपल्याजवळ राहते. वाचनासाठी वेगळा वेळ काढावा लागतो, असे मला वाटत नाही. मी संधी मिळेल तिथे वाचतो. रेल्वे, गाडीत प्रवास करताना वाचन होत असेल तर वाहतूक कोंडी, गर्दी जाणवत नाही. सध्या मी आश्विन सांघी यांचे ‘द रोझेबल लाइन’ हे पुस्तक वाचत आहे. आपण वाचत असलेल्या पुस्तकाच्या लेखकाला आपल्याला भेटता आले तर कुणालाही हे आवडेल. ‘समुद्र’ नाटक केले तेव्हा मिलिंद बोकील यांना भेटता आले तो आनंदाचा क्षण होता. एकदा लेखक जेफ्री आर्चर अंधेरीमध्ये आलेले असताना त्यांना भेटायची इच्छा होती. मात्र प्रचंड गर्दीमुळे मी त्यांच्यापर्यंत पोहचू शकलो नाही आणि त्यांची सही घेता आली नाही ही खंत आहे.

आवडते लेखक
पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यापासून वाचनाची सवय मला लागली. त्यामुळे पु. ल. देशपांडे आवडते लेखक आहेत. त्यानंतर पी. जी. गुडहाऊस, विजय तेंडुलकर, जे. के. रोलिंग हे आवडते लेखक आहेत.

आवडती पुस्तके
गॅब्रियल गार्सिया मार्केस यांचे ‘वन हन्ड्रेड इयर ऑफ सोलिटय़ूड’, मोहन राकेश यांचे ‘आसाढ का एक दिन’, पुलंचं ‘व्यक्ती आणि वल्ली’, हॅरी पॉटरचे सातही भाग तसेच पी. जी. वुडहाऊस यांनी लॉर्ड एम्सवर्थ यांच्यावर लिहिलेल्या कथा वाचायला आवडतात.

वाचनसंस्कृतीचा ऱ्हास होत आहे असे माझे मत नाही. प्रत्येक व्यक्तीला वाचायला आवडते असे नाही. प्रत्येकाची आवड वेगळी असते. काही व्यक्तींना पुस्तक वाचनाचा कंटाळा येतो, मात्र त्यांच्यासाठी ऑडिओ बुक्सचा उत्तम पर्याय आहे.

शब्दांकन-किन्नरी जाधव