मालमत्ता प्रदर्शनात बिल्डरांना पालिकेच्या प्रकल्पांचा आधार; अवाजवी किमतीमुळे ग्राहकांचा अपेक्षाभंग

देशभरातील बांधकाम क्षेत्रात मंदीचे वातावरण असल्याची चर्चा एकीकडे जोमाने सुरू असताना ठाण्यात सुरू झालेल्या मालमत्ता प्रदर्शनात विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या घरांचे दर चढेच असल्याचे दिसून येत आहे. ठाणे आणि आसपासच्या भागात होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांकडे बोट दाखवत घरांचे जास्त दर ठेवणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांनी आता महापालिकेमार्फत शहरात उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पांचा आधार घेत सदनिकांचे मूल्य वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, वाढीव किमतीमुळे ठाण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांचा अपेक्षाभंग झाला आहे. दरम्यान, प्रदर्शनात मांडण्यात आलेले घरांचे दर चढे असले खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्या ग्राहकांना सुलभ हप्त्यांची गाजर दाखविण्यात आले आहे.

ठाणे महापालिका हद्दीत घोडबंदर आणि शीळ-कल्याण मार्गालगत मोठय़ा गृह प्रकल्पांची उभारणी सुरु असून महापालिकेनेही गेल्या काही वर्षांत त्यानुसार विकास प्रकल्पांची आखणी सुरु केली आहे. पोखरण मार्गाच्या रुंदीकरणानंतर शहरात बडय़ा बिल्डरांना बांधीव विकास हस्तांतरण हक्क बहाल करत महापालिकेने विवीध विकास प्रकल्पांची उभारणी सुरु केली असून घोडबंदर भागात दोन मोठय़ा उद्यांनाची निर्मीती अंतिम टप्प्यात आहे. गुरुवारी ठाण्यातील हायलंड पार्क मैदानात बिल्डरांच्या एका संघटनेने मालमत्ता विक्री प्रदर्शन सुरू केले असून पहिल्या दिवशी या प्रदर्शनाकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले. असे असले तरी काल-परवापर्यत ठाणे मेट्रोच्या नावाने घर विक्रीची जाहिरात करणाऱ्या बिल्डरांनी या प्रदर्शनात मात्र ठाणे महापालिकेने आखलेल्या विवीध प्रकल्पांचा आधार घेतल्याचे दिसून आले. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही या प्रदर्शनाला भेट देत महापालिकेने आखलेल्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण यावेळी केले. घोडबंदर भागात उद्याने, मैदाने तसेच लोकोपयोगी वास्तूंची उभारणी होत असून हा परिसर रहाण्यासाठी उत्तम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेने आखलेल्या विविध प्रकल्पांच्या या जाहिरातबाजीमुळे बिल्डरांना दिलासा मिळाला असल्याचे चित्र याठिकाणी दिसून येत होते.

देशभरातील मालमत्ता बाजारात मंदीचे सावट असल्याची चर्चा एकीकडे असताना ठाण्यातील या मालमत्ता प्रदर्शनात घरांचे दर तुलनेने कमी असतील अशी अपेक्षा ग्राहकांना होती. मात्र, घोडबंदर मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या गृहसंकुलातील घरांचे दर अजूनही चढेच असून काही प्रकल्पांमध्ये ४३० चौरस फुटाच्या (कार्पेट एरिया) घरांच विक्री ८० ते ८५ लाख रुपयांनी होत असल्याचे दिसून आले. राज्य सरकारने ठाणे मेट्रो प्रकल्पाचा विस्तार गायमुखपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. हा विस्तार भाइंदरपाडा तसेच आसपासच्या परिसरात उभ्या राहणाऱ्या मोठय़ा गृहप्रकल्पांच्या पथ्यावर पडल्याचे चित्र आहे. याच भागातील काही बिल्डरांनी गृह प्रकल्पात ८० लाखापासून दीड कोटी रुपयांपर्यंतची घरे विक्रीसाठी मांडली असून खरेदीदारांसाठी विशेष योजनांची आखणी करण्यात आली आहे. तसेच भिवंडी, कल्याण भागातील काही घरे याठिकाणी विक्रीसाठी मांडली असून या घरांचे दर ४० लाखापासून सुरू होत आहे. मात्र घरांचे दर चढेच आहेत.

सुलभ हप्त्यांचे गाजर

काही बिल्डरांनी प्रकल्पाची सुरुवात करताना पहिले तीन वर्षे एकूण किमतीपैकी प्रत्येकी दहा टक्के आणि अखेरच्या वर्षी थेट ७० टक्के रक्कम भरण्याची योजना काही बिल्डरांनी या प्रकल्पात मांडली आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून घरांच्या दरामध्ये फारसा फरक पडलेला नसून त्याच दराप्रमाणे यंदाच्या प्रदर्शनात घराची विक्री सुरू आहे. या प्रदर्शनात ४० लाखांपासून दीड कोटी रुपयांपर्यंतच्या घरांचे पर्याय ग्राहकांसाठी खुले आहेत. त्यामुळे प्रदर्शनात घरांचे दर चढे नाहीत. शनिवारी, रविवारी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढेल.

सचिन मराणी, ‘एमसीएचआयचे पदाधिकारी