घर स्थलांतरासाठी सामान वाहतुकीची मागणी घटल्याचा दावा; वाहतूकदरांत कपात करण्याचा निर्णय

ऋषिकेश मुळे, लोकसत्ता

ठाणे : बांधकाम क्षेत्रावर मंदीचे मळभ दाटल्याने या क्षेत्राशी थेट संबंध येत असलेल्या अन्य क्षेत्रांमध्ये अस्वस्थता असताना आता मालवाहतूकदारांनाही याची काही अंशी झळ बसू लागली आहे. घर स्थलांतर करताना घरगुती सामानाची वाहतूक करण्यासाठी येणाऱ्या मागणीत घट झाल्याचा वाहतूकदारांचा दावा आहे. मागणी घटल्याने या वाहतुकीच्या दरात कपात करण्याचा निर्णय वाहतूकदारांच्या संघटनेने घेतला आहे.

दोन वर्षांपूर्वी घरगुती सामान एका घरातून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी सरासरी दररोज एक तरी मागणी होत असे. गेल्या काही महिन्यांपासून एका वाहतूकदाराला या कामासाठी चार ते पाच दिवसांची वाट पाहावी लागत आहे, अशी माहिती वाहतूकदारांनी दिली. बांधकाम व्यवसायात मंदी असून त्याचा हा फटका आहे, असे वाहतूकदारांचे म्हणणे आहे.

मालवाहतूकदारांचा थांबा असणाऱ्या ठाण्यातील रोड क्रमांक १६, मुलुंड चेकनाका या भागातील मालवाहतूकदार सध्या कमालीचे चिंतेत आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागांत मोठी गृहसंकुले उभी राहात आहेत. असे असले तरी नव्याने या भागात राहण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबीयांमध्ये दोन वर्षांत घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी ठाणे शहरातून या भागात घरातील सामान स्थलांतरित करण्यासाठी रोज एक तरी मागणी होत असे. आता चार ते पाच दिवसांनी जिल्ह्य़ातील गृहसंकले उभ्या राहिलेल्या ठिकाणी सामान स्थलांतर करण्यासाठी काम मिळत असल्याचे मालवाहतूकदारांकडून सांगण्यात आले.

सद्य परिस्थितीत सामान स्थलांतर करण्याचे काम मिळावे यासाठी ग्राहकाला यापूर्वीच्या दरापेक्षा भाडेदरही कमी करण्यात आल्याचे मालवाहतूकदार किरण वर्मा यांनी सांगितले. यापूर्वीच्या दरांच्या तुलनेत सद्याचे दर हे प्रत्येक फेरीमागे ५०० ते १ हजार रुपयांनी कमी केले आहेत. सामान वाहून नेण्यासाठीही पाचऐवजी चारच माणसांची नेमणूक करण्यात येत असल्याचे वर्मा यांनी सांगितले.

अनेक नागरिक घराचे स्थलांतर करत नसल्याने मालवाहतूक उद्योगावर परिणाम झाला आहे. चार ते पाच दिवसांनी वस्तूंचे स्थलांतराचे काम मिळते.

– संदीप पवार, मालवाहतूकदार, ठाणे

सामान वाहतुकीचे दर (एक टेम्पो आणि चार व्यक्ती)

मार्ग    दर (रुपये)

ठाणे ते भिवंडी   ३ हजार

ठाणे ते कल्याण  ४ हजार ५००

ठाणे ते बदलापूर ६ हजार

ठाणे ते टिटवाळा ७ हजार