News Flash

जुन्या कापड बाजारात नोटाबंदीमुळे मंदी

ठाण्यातील कोपरी भागात जुन्या कपडय़ांचा बाजार हा गेली चाळीस वर्षांपासून सुरू आहे.

 

विक्रेते, व्यापारी चिंताग्रस्त

पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्याचा फटका शहरातील विविध भागांत भरणाऱ्या आठवडी बाजार तसेच ठाणे पूर्व परिसरातील कोपरी येथे भरणाऱ्या जुन्या कपडय़ांच्या बाजारालाही मोठय़ा प्रमाणात बसला आहे. रोखीचे व्यवहार ठप्प झाल्याने बहुतांश व्यापाऱ्यांनी गेल्या आठ दिवसांपासून या बाजाराकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी फिरून जुने कपडे गोळा करून या बाजारात विक्रीस आणणाऱ्या छोटय़ा विक्रेत्यांची मोठी पंचाईत झाली आहे.

ठाण्यातील कोपरी भागात जुन्या कपडय़ांचा बाजार हा गेली चाळीस वर्षांपासून सुरू आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत गजबजणारा हा परिसर गेल्या आठवडय़ापासून सुरू असलेल्या चलनकल्लोळामुळे थंडावलेला आहे. ठाणे, दिवा, मुंब्रा इत्यादी भागांतून जवळपास अडीच हजार विक्रेते या बाजारात जुने कपडे विकायला येतात. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून या बाजारात येणारे विक्रेते घटल्याचे चित्र आहे. चलनतुटवडय़ामुळे रोखीचे व्यवहार करण्यास पुरेसा पैसा नसल्याने कपडे विकत घेणाऱ्या लहान व्यापाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय घट झाल्याचे दिसत आहे.

मालाला मागणी नसल्याने येणारे व्यापारी दर पाडून माल मागत आहेत आणि याचा फटका छोटय़ा विक्रेत्यांना बसत आहे. जुने कपडे विकून रोजीरोटी करणाऱ्या या विक्रेत्यांना मागेल त्या भावात माल विकण्यावाचून पर्याय उरलेला नाही. ‘नोटाबंदीनंतर बाजार चार दिवस बंद होता. त्या काळात गाठीशी असलेल्या पैशाने कसेबसे दिवस काढले. आता या बाजारात दहा रुपयांच्या जुन्या शर्टाची किंमत जेमतेम दोन रुपये मिळत. माल घेऊन त्याबदल्यात दिलेल्या भांडय़ांची किंमतही पुरेशी मिळत नाही. त्यामुळे आमचे नुकसान होत आहे. माल किती दिवस पाडून ठेवणार आणि पोटाला काय खाणार, अशी व्यथा इथल्या एका बोहारणीने मांडली. माझ्या या कपडे विकण्याच्या धंद्यावर चार जणांचे कुटुंब जगते. आज हातात फक्त दीडशे रुपये आलेत. यातले घरखर्चाला किती देणार आणि भांडवल म्हणून भांडी कशी घेणार, असा प्रश्न इथल्या एका जुन्या कपडय़ाच्या विक्रेत्याला पडला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 12:12 am

Web Title: recession in old cloth market due to note banned issue
Next Stories
1 रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेवर प्रवाशांचाच ‘झाडू’
2 सेवा रस्ते मोकळा श्वास घेणार!
3 ग्रामीण विद्यार्थ्यांच्या नशिबी परीक्षेनंतर सत्त्वपरीक्षा
Just Now!
X