News Flash

पाणीटंचाई निवारणासाठी भूजल पुनर्भरण

सर्वसाधारण कूपनलिका भूजल साठा उपसतात. मात्र, आम्ही खोदलेल्या या कूपनलिका पावसाचे पाणी मोठय़ा प्रमाणात जमिनीत जिरवतात.

शहापूरमधील दांड उंब्रावणे गावात लहू वातडे यांच्या शेतात राबविण्यात आलेला प्रकल्प.

दुष्काळग्रस्त गावांमध्ये योजना कार्यान्वित

राज्यात भूजल पातळी चिंताजनकरीत्या घटल्यानंतर खडबडून जागे झालेल्या शासनाने आता जलयुक्त शिवार योजनेतील गावांमध्ये कूपनलिका स्तंभाद्वारे जमिनीत थेट १०० फूट आत पाण्याचे पुनर्भरण करण्याची योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील काही अतिटंचाईग्रस्त गावांमध्ये जमिनीच्या थेट उदरात पाणी नेऊन सोडण्याचा हा प्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे शहापूरमधील दांड उंब्रावणे, कोथळे, पाटोळ, पष्टेपाडा, वावरेवाडी तर मुरबाडमधील पेंढरी, पोटगांव, भदाणे या गावांमध्ये आता विहीर आणि टँकरव्यतिरिक्त पाण्याचा एक अतिरिक्त स्रोत निर्माण झाला आहे.

दांड उंब्रावणे हे कसाऱ्यापासून आठ किलोमीटर अंतरावर पठारावर वसलेले ५०० लोकवस्तीचे गाव. ठाणे जिल्ह्य़ातील अतिटंचाईग्रस्त गावांमध्ये याचा समावेश होतो. गावात दोन विहिरी असल्या तरी त्यातील एक जानेवारी महिन्यात तर दुसरी मार्च महिन्यात आटते. त्यामुळे त्यानंतर पाऊस पडेपर्यंत या गावाला पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते. तीव्र चढाचा रस्ता असल्याने इथे टँकर येण्यातही अडचणी येतात. त्यामुळे भूजलाचे पुनर्भरण करण्याची योजना या गावात पहिल्या टप्प्यात राबविण्यात आली. गावातील लहू पांडुरंग वातडे या शेतकऱ्याने या प्रकल्पासाठी जागा दिली. विहिरीच्या वरच्या बाजूला ठरावीक अंतराने सहा ठिकाणी सहा इंची व्यासाच्या वाहिन्या जमिनीत १०० फूट खोल टाकण्यात आल्या. त्या प्रत्येक वाहिनीच्या भोवती वर्षां जलसंचयनासाठी शोषखड्डे करण्यात आले. पावसाळ्यापूर्वी ही योजना राबविण्यात आली. या सहा कूपनलिकांमुळे परिसरातील भूजलाचे पुनर्भरण झाल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या तपासणीत दिसून आले आहे. या भूजलामुळे विहिरीतील पाण्याची पातळी वाढून त्यात किमान महिना ते दोन महिने अधिक पाणीसाठा होईल. तसेच कूपनलिकेतील पाणी पंपाद्वारे उचलून गावकऱ्यांना वापरताही येईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

सर्वसाधारण कूपनलिका भूजल साठा उपसतात. मात्र, आम्ही खोदलेल्या या कूपनलिका पावसाचे पाणी मोठय़ा प्रमाणात जमिनीत जिरवतात. ठाणे जिल्ह्य़ात प्रथमच हा प्रयोग करण्यात आला. त्याचे चांगले परिणामही दिसले. त्यामुळे आता पुढील टप्प्यांमध्ये लवकरच भिवंडी आणि शहापूरमधील आणखी प्रत्येकी तीन गावांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.

-एम.एस. शेख, वरिष्ठ भूवैज्ञानिक, ठाणे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 3:46 am

Web Title: recharge of ground water for the reduction of water shortage
Next Stories
1 डोंबिवलीत रस्तारुंदीकरणाचे वारे
2 लोकलधक्के आणखी दोन वर्षे
3 वणव्यात ‘वनराई’ खाक
Just Now!
X