लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : राज्यात छायाचित्रासह मतदारयाद्यांच्या विशेष पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून विभागीय आयुक्त तथा मतदारयादी निरीक्षक अण्णासाहेब मिसाळ यांनी सोमवारी ठाणे जिल्ह्यातील या कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ठाणे जिल्ह्यत या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबरोबरच मतदार जनजागृती आणि मतदार नोंदणी कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

राज्यात १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांच्या विशेष पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम घोषित केला आहे. विभागीय आयुक्त तथा मतदारयादी निरीक्षक अण्णासाहेब मिसाळ यांनी सोमवारी ठाणे जिल्ह्यतील या कार्यक्रमाचा आढावा घेतला. त्यांनी मतदार यादी, संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम, मतदार छायाचित्र त्रुटी, मतदारांचे अचूक ओळखपत्र तयार करणे, मतदार वगळणी, मतदार यादीतील तांत्रिक त्रुटी दुरुस्ती करणे, भारत निवडणूक आयोगाच्या तक्रार निवारण पोर्टलवर तक्रारी अशा विविध बाबींचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्पणा सोमाणी तसेच ठाणे जिल्ह्यतील १८ विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. यावेळी स्विप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यत जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त मिसाळ यांनी दिले.

विभागीय आयुक्तांच्या सूचना

मतदार याद्यांमध्ये असलेल्या तांत्रिक अडचणी तात्काळ दूर कराव्यात. नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. तसेच मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेली मृत मतदार, दुबार नाव नोंदणी असलेले मतदार आणि स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाहीही याच दरम्यान करणे आवश्यक आहे, अशा सूचना यावेळी विभागीय आयुक्त मिसाळ यांनी दिल्या. ही कार्यवाही करताना योग्य ती शहानिशा केल्यानंतरच मतदारांची नावे वगळावी. मतदार याद्यांच्या विशेष पुनर्निरीक्षणाच्या कार्यक्रमासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्राधान्यक्रमाने करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.