कल्याण-शीळफाटा रस्त्यावरील अनेक लेडीज बार रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याच्या तक्रारी असताना यापैकी एका बारमध्ये नृत्य करताना दोन पोलीस कर्मचारी सापडल्याने ठाणे पोलिसांच्या अब्रूचे िधडवडे निघाले होते. या सगळ्या प्रकरणी मानपाडा पोलीस बदनाम होत असल्याने उशिरा जागे झालेल्या स्थानिक पोलिसांनी पुढाकार घेऊन मानपाडा परिसरातील चार बारचे परवाने रद्द करण्याची शिफारस ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे. उत्पादन शुल्क विभागाला याबाबत कळवण्यात आले आहे. वर्षांनुवर्षे कल्याण-शीळमार्गावर लेडीज बारच्या माध्यमातून छमछम सुरू ठेवणाऱ्या पोलिसांना उशिरा का होईना जाग आल्याचे चित्र या निमित्ताने पुढे आले आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी उशिरापर्यंत लेडीज बार सुरू असतात हे यापूर्वीही उघड झाले आहे. उपवनसारख्या निसर्गरम्य परिसरात, येऊर जंगलाच्या पायथ्याशी आजही मोठय़ा प्रमाणावर लेडीज बार सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. कल्याण-शीळ मार्गावर लेडीज बारच्या माध्यमातून केला जाणारा दौलतजादा यापूर्वीही चर्चेचा विषय ठरला आहे. असे असताना येथील छमछमकडे वर्षांनुवर्षे दुर्लक्ष करणाऱ्या स्थानिक पोलिसांनी या मार्गावरील इंद्रप्रस्थ, पिंगारा, रसिला आणि इगो या बीअर बारचे परवाने रद्द करण्यात यावेत, अशी शिफारस पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली आहे. स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने हे महिला बार, नृत्य बार मोठय़ा धडाक्यात सुरू असल्याचे बोलले जाते. या बारच्या बाजूला पीकअप पॉइंटच्या नावाखाली लॉजिंग चालवले जाते. परवाने रद्द करण्यासाठी पाठवलेल्या चार बार विषयीच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. या बारमध्ये अश्लील नृत्य, गाणी सुरू असतात. रात्री उशिरापर्यंत हे बार सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या, असे पोलिसांचे म्हणणे आहे. असे असताना त्यावर यापूर्वी कठोर कारवाई का झाली नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे. या तक्रारींची दखल घेऊन आपल्यावरील बदनामी, टीकेची झोड कमी करण्यासाठी मानपाडा पोलिसांनी बारचे परवाने रद्द करण्याची शिफारस पोलीस आयुक्तांकडे केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेली अनेक वर्षे या मार्गावरील लेडीज बार सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसवून बिनदिक्कत सुरू आहेत. असे असताना इतकी वर्षे त्याकडे डोळेझाक करणाऱ्या स्थानिक पोलिसांनी उशिरा का होईना यासंबंधी हालचाली सुरू केल्या आहेत.